निफाड l Niphad (वार्ताहर)

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील गोदाकाठच्या परिसराला निसर्गाची सुंदर देणगी भेटलेली आहे. प्राचीन कालीन मंदिरे आणि गोदावरी नदीचे विलोभनीय दृश्य डोळ्यांना मोहवून टाकणारे आहे. परंतु सध्या नाशिक जिल्ह्यातून वाहणारी गोदावरी नदी पानवेलींच्या विळख्यात सापडली असून पानवेलीने गोदापात्र पूर्णतः व्यापून टाकले आहे.

लालपाडी, दारणा सांगवी सह चांदोरी व सायखेडा भागात पानवेलींनी गोदावरीचे पात्रच झाकले गेले असून या गोदापात्रातून पानवेली हटविण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

निफाड तालुक्यातील चाटोरी, लालपाडी, दारणा सांगवी, सायखेडा, चांदोरी, भागात वाहणारी गोदावरी नदी वाढलेल्या पानवेलींमुळे दिसेनाशी झाली आहे, त्याचबरोबर या पानवेलीमुळे सतत निखळ वाहण्याऱ्या पाण्याला मोठ्या प्रमाणात संथ गती प्राप्त झाली आहे. यामुळे पाण्यात जीव जंतू , किटके तयार होऊन पाणी दूषित होण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे.

यामुळे पाण्यातील मासे आणि इतर जीवांबरोबर आसपासच्या लोकांचे ही आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे. सदर परिसरातील बहुतांश लोकांचे उपजीविकेचे शेती हे प्रमुख साधन असून पानवेलीचा कृषी उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होत असल्याची तक्रार नागरिक करत आहे.

त्याच बरोबर सदर परिसरात पुराचे प्रमाण अधिक असल्याने पूर आल्यानंतर ही पानवेल आसपासच्या परिसरात पाण्याबरोबर पसरली जाऊन अडकून बसते. याचा नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागतो .

ग्रामस्थांनी अनेकदा जलसंपदा विभागांना याबाबतीत निवेदनं दिली आहे. जलसंपदा विभागाने या गोदावरी नदीपात्रातील पानवेली तत्काळ हटवाव्यात, अशी मागणी गोदाकाठ भागातील ग्रामस्थांनी केली आहे.

प्रशासनाने यावर तात्पुरती उपाययोजना बरोबरच काहीतरी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. नाहीतर पर्यावरणाची हानी होऊन भविष्यात मोठ्या समस्या ही उद्भवू शकतात.