नाशिक बाजार समितीत आता 'स्मार्ट हेल्मेट'द्वारे स्क्रीनिंग

नाशिक बाजार समितीत आता 'स्मार्ट हेल्मेट'द्वारे स्क्रीनिंग

पंचवटी I वार्ताहर panchvati

नाशिक बाजार समितीमध्ये रॅपिड अँटीजेन टेस्टनंतर आता शेतकरी, व्यापाऱ्यांसह बाजार घटकांचे स्मार्ट हेल्मेटद्वारे स्कॅनिंगही सुरू करण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भारतीय जैन संघटनेच्या वतीने आणि कृषी उत्पन्न बाजार समिती व नाशिक महापालिका यांच्या पुढाकाराने दिंडोरी रोड मार्केट येथे शुक्रवारी (दि.४) स्मार्ट हेल्मेट मास स्क्रीनिंग या तंत्रज्ञानावर आधारित स्मार्ट कामकाजाचा शुभारंभ झाला...

याप्रसंगी मनपा आयुक्त कैलास जाधव, जिल्हा उपनिबंधक सतीश खरे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती देवीदास पिंगळे, बीजेएस मिशन झिरो प्रकल्प संचालक नंदकिशोर साखला, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत, मनपा विभागीय अधिकारी विवेक धांडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय देवकर, भूषण देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

नाशिक जिल्हयामध्ये कोरोना नियमांचे पालन होण्यासाठी करण्यात आलेले कडक लॉकडाऊन दि. १ जूनपासून शिथील करण्यात येऊन शेतकरी बांधवांचे अर्थचक्र सुरू रहावे, याकरीता राज्य शासनाने जिल्ह्यातील बाजार समित्या पूर्ववत केल्या आहेत. बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी शेतकरी व बाजार घटकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून नवनवीन योजना अंमलात आणण्याचा प्रयत्न बाजार समिती संचालक मंडळाकडून सातत्याने केला जात आहे.

याचाच एक भाग म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन मास स्क्रीनिंगद्वारे शारीरिक तापमान जास्त असलेल्या संशयित नागरिकांचा शोध घेण्यासाठी स्मार्ट हेल्मेट तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्यामुळे संशयित रुग्णांवर योग्य ते औषधोपचार होण्यासाठी त्यांना सहाय्य करणे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी बाजार समिती आवारातील सेलहॉलमध्ये जाऊन मास स्क्रिनिंग कशा प्रकारे केली जाणार, याचे मार्गदर्शन केले व यासाठी बाजार घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

मास स्क्रिनिंगकरीता उपकरणे व कर्मचारी उपलब्ध करुन दिल्याबद्दल भारतीय जैन संघटनेचे नंदुशेठ साखला यांचे पिंगळे यांनी आभार मानले. याप्रसंगी 'बीजेएस'चे दीपक चोपडा, अभय ब्रम्हेचा, यतीश डुंगरवाल, गोटू चोरडिया, सतीश बोरा आदींसह बाजार समितीचे संचालक दिलीप थेटे, तुकाराम पेखळे, विश्वास नागरे, रवींद्र भोये, संदीप पाटील, सहाय्यक सचिव प्रकाश घोलप सहा. सचिव निवृत्ती बागुल, रवींद्र तुपे, डॉ. शालोम सय्यद व कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com