ना.रोड । Nashik

नाशिकरोड रेल्वेस्थानकात महापालिकेची तीन पथके देशभरातून येणार्या रेल्वे प्रवाशांचे दोन महिन्यांपासून स्क्रीनिंग तसेच संशयितांची करोना टेस्ट करत आहेत. आतापर्यंत 70 हजार प्रवाशांचे स्क्रीनिंग करण्यात आले. चार करोना पॉझिटिव्ह आढळले. प्रवाशांची टेस्ट घेणार्या तंत्रज्ञाचा त्यात समावेश आहे.

मार्चमध्ये देशात लॉकडाऊन झाल्यापासून रेल्वेगाड्या बंद होत्या. काही महिन्यांनंतर श्रमिक ट्रेन सोडण्यात आल्या. आता नेहमीच्या गाड्या बंद असल्या तरी विशेष रेल्वेगाड्या सुरू आहेत. नाशिकरोड स्थानकातून दररोज 55 ते 60 प्रवासी रेल्वेगाड्या धावत आहेत.

त्यातून दोन ते अडीच हजार प्रवासी नाशिकरोड स्थानकात येतात. त्यांना करोना झाल्यास शहरात पुन्हा करोनाची रुग्णसंख्या वाढू शकते. हा धोका लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने रेल्वेच्या मदतीने प्रवाशांची करोना टेस्ट सुरू केली आहे. त्याआधी रेल्वेतर्फे केवळ प्रवाशांच्या टेम्परेचरची नोंद घेतली जात होती.

महापालिकेच्या बिटको कोविड सेंटरचे प्रमुख डॉ. जितेंद्र धनेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वेस्थानकात करोना टेस्टिंगसाठी केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी तीन पथके असून ती तीन शिफ्टमध्ये चोवीस तास काम करतात. ही पथक रेल्वेने शहरात येणार्या सर्व प्रवाशांची तापमान चाचणी घेतात.

संशयित प्रवाशांची करोना रॅपिड टेस्ट घेण्यात येते. त्यात आतापर्यंत चार जणांना करोना आढळला. आठ तासांच्या एका शिफ्टमध्ये हजार ते बाराशे प्रवासी रेल्वेस्थानकात येतात. आधी घरपट्टी विभागातील सेवक येथे काम करायचे. आता आरोग्य विभागाचे सेवक आहेत.

प्रवाशांची करोना टेस्ट करणार्या पथकांमध्ये दिवाकर गांगुर्डे, गौतम पगारे, विजय संगपाळ, आरती आव्हाटे, स्मिता कोकणी, ऋग्वेद शहाणे, अनिल चौधरी, आशिष भडांगे, चेतन साळवे, अनिल चौधरी, अक्षय घोडके, दयानंद गायकवाड यांचा समावेश आहे.

पथकाला सॅनिटायझर, टेस्टिंग किट, टेंपरेचर गन, ऑक्सिजन प्रोब आदींचा समावेश आहे. येणारे बरेचसे रेल्वे प्रवासी मास्क व सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत. रजिस्टरमध्ये नोंदवण्यासाठी माहिती देण्यास टाळाटाळ करतात.