
मालेगाव । प्रतिनिधी Malegaon
विद्यार्थ्यांच्या शिक्षण, खेळाला व कलागुणांना वाव मिळावा या दृष्टीकोनातून दाभाडीत साडेपाच कोटी रूपये खर्च करून सुसज्ज क्रिडा संकुल व सांस्कृतिक भवनाची उभारणी करण्यात आली आहे. या क्रिडा संकुलाच्या माध्यमातून आदिवासी तरूणांनी तालुक्याचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन पालकमंत्री दादा भुसे यांनी येथे बोलतांना केले.
दाभाडी येथील रोकडोबानगर भागात रूरबन व जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सहा एकर जागेत साकारलेल्या भगवान वीर एकलव्य महाराज क्रिडा संकुल व सांस्कृतिक भवन इमारतीचे लोकार्पण सोहळ्यात मार्गदर्शन करतांना पालकमंत्री दादाजी भुसे बोलत होते. आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांच्या हस्ते या क्रिडा संकुलाचे लोकार्पण केले गेले. यावेळी प्रांत नितीन सदगीर, तहसिलदार नितिनकुमार देवरे, कार्यकारी अभियंता शैलेश शिंदे, शाखा अभियंता नवनाथ आंधळे, उपअभियंता अली इनामदार, गट विकास अधिकारी भरत वेंदे, दाभाडी सरपंच प्रमोद निकम, नीलेश आहेर, जिल्हाप्रमुख अॅड. संजय दुसाने, सुनिल देवरे, महानगरप्रमुख विनोद वाघ, सुरेश पवार, डॉ. जतीन कापडणीस, भरत देवरे, महिला आघाडीप्रमुख संगीता चव्हाण, छाया शेवाळे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सर्व सुविधांनी युक्त क्रिडा संकुल व सांस्कृतीक भवन तालुक्यास सेवा देणारे केंद्र ठरणार असल्याचे स्पष्ट करत पालकमंत्री भुसे पुढे म्हणाले, तालुक्यात शिक्षण, खेळ व व्यसनमुक्तीसाठी प्राधान्याने कामे केली जात आहे. या सांस्कृतिक भवनात आदिवासी बांधव विविध कार्यक्रम साजरे करु शकणार आहेत. येत्या काळात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिक्षण, खेळासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देवू, अशी ग्वाही दिली.
लहान पाडयावरील कविता राऊत या प्रचंड मेहनतीच्या बळावर आंतरराष्ट्रीय धावपटू म्हणून नावारुपास आल्या व त्यांनी देशाचा नावलौकिक वाढवला. त्यांचा आदर्श आपण सर्वांनी घेतला पाहिजे, असे आवाहन करत पालकमंत्री भुसे म्हणाले, जिल्हा परिषदेमार्फत अनुसूचित जाती व अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील निवडक 50 विद्यार्थ्यांची एक पात्रता परीक्षा घेतली जाते. यात जे 50 विद्यार्थी उत्तीर्ण होतात त्या 50 विद्यार्थ्यांची होस्टेलमध्ये राहण्याची व क्लासेसची मोफत व्यवस्था केली जात आहे. याच सुपर 50 च्या धर्तीवर मालेगावच्या 100 मागासवर्गीय विद्यार्थ्यांची परिक्षा घेतली जाणार आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळा दुरुस्त गेल्या जात आहेत. काही शाळा नवीन बांधण्यात येत आहेत. या वर्षी जिल्ह्यातील 127 जिल्हा परिषदेच्या शाळा आदर्श शाळाची निर्मिती करण्यात येत असून यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण व नोकरीसाठी जातीचा दाखला सहज उपलब्ध होण्यासाठी सरंपच, ग्रामसेवक, तलाठी यांनी हे कुटूंब 50 वर्षांपासून राहात असल्याचे लेखी प्रमाणित केल्यास अशा कुटूंबास जातीचे दाखले सहज उपलब्ध करुन देण्याच्या सूचना पालकमंत्री भुसे यांनी शेवटी बोलतांना केले.
यावेळी मार्गदर्शन करतांना आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांनी क्रिडा संकुलाच्या माध्यमातून जिल्हाच नव्हे तर राज्य व राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक उंचावेल, असे काम करत येथील सोयीसुविधांचा लाभ तरूणांनी घ्यावा, असे आवाहन केले.
या कार्यक्रमात पालकमंत्री भुसे व धावपटू कविता राऊत यांच्या हस्ते स्पर्धा परिक्षेत पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झालेल्या शैला पाथरे, ज्ञानेश्वर दुधेकर, कृषि अधिकारी आकाश सोनवणे, अभियंता शैलेश शिंदे, ए.जी. इनामनदार यांच्यासह राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध क्रिडा स्पर्धेत यश मिळविणार्या विद्यार्थी व क्रिडा शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शशिकांत निकम यांनी तर सुत्रसंचालन पराग निकम यांनी केले.
कार्यक्रमास मविप्र चिटणीस दिलीप दळवी, नारायण शिंदे, अजय बच्छाव, भाजप तालुकाध्यक्ष नीलेश कचवे, लकी गिल, रिपाइं जिल्हाप्रमुख भारत जगताप, दिलीप अहिरे, सखाराम घोडके, प्रमोद पाटील, राजेश अलीझाड, एकलव्य संघटनेचे राजेंद्र माळी आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.