सिन्नर | Sinnar

शहरातील कानडी मळा भागातील प्रज्योत सुभाष जाधव या 13 वर्षीय शाळकरी मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार गुरुवारी (दि.10) सायंकाळी 7 च्या दरम्यान उघडकीस आला.

प्रज्योतचे वडील मुसळगाव औद्योगिक वसाहतीत कामाला असून ते सकाळपासूनच कामावर गेलेले होते.

प्रज्योत व त्याचा मोठा भाऊ, आई हे घरी होते. घराजवळच असणार्या क्रिकेटच्या मैदानावर प्रज्योत इतर मित्रांबरोबर क्रिकेट खेळला. शेठ ब. ना. सारडा विद्यालयात 7 वीत शिकणार्या प्रज्योतने सायंकाळी ऑनलाईन क्लासला उपस्थिती दिली. त्यानंतर भुक लागल्याचे त्याने सांगितल्यानंतर आईने त्याला चहा-बिस्कीटे दिली.

त्यानंतर आई घराच्या बाहेर इतर मैत्रिणींबरोबर गप्पा मारत बसली. तर त्याचा मोठा भाऊ शेजारच्या घराच्या माडीवर अभ्यास करत होता. 10-15 मिनिटांनंतर आईने घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता, दरवाजा आतून बंद होता.

त्यांनी प्रज्योतला आवाज दिल्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने खिडकीतून त्यांनी बघितले असता घराच्या मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजुने इलेक्ट्रीक वायरचा गळ्याला फास बसलेल्या अवस्थेत प्रज्योत त्यांना दिसला. त्यांनी घाबरुन आवाज दिल्यानंतर आजुबाजूला राहणार्यांनी घराकडे धाव घेतली. मुख्य दरवाजाच्या बाहेरुन असणारा लोखंडी सेफ्टी डोअर कटरच्या सहाय्याने तोडण्यात आला.

मुख्य दाराच्या बाहेरच्या कडी-कोंड्याला इलेक्ट्रीक वायर बांधलेली होती. तर तिचे दुसरे टोक दारावरुन आतल्या बाजूला प्रज्योतच्या गळ्यात बांधलेले होते. गळ्याला फास बसल्याने त्याची जिभ तोंडातून बाहेर आलेली होती व फेस गळत होता.

शेजारी राहणार्यांनी त्याला त्वरीत खासगी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. नगर परिषद दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी प्रशांत खैरनार यांनी आज (दि.11) सकाळी शवविच्छेदन केल्यानंतर दुपारी 1 च्या दरम्यान चांदवड तालुक्यातील जोपूळ या जाधव परिवाराच्या मूळगावी मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आले.

शाळेत हुशार असणारा व सर्वांमध्ये मिळून मिसळून वागणार्या प्रज्योतच्या अकाली मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.