
नाशिक । प्रतिनिधी Nashik
गत दोन वर्षाच्या करोना ( Corona ) संकटाला दूर सारत नवीन शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी विद्यार्थी सज्ज झाले आहे. प्रवेशोत्सावासाठी ( Praveshostav ) शाळाही सजल्या आहेत. नवीन मित्र-मैत्रिणी, नवीन पाठ्यपुस्तके, बदललेली शाळा, शिक्षकांचे बदललेली चेहरे बघण्यासाठी मुला, मुलींना उत्सुकता लागली आहे. शाळेच्या प्रांगणात बुधवारपासून पुनश्च एकदा हसू खेळू बागडू लागणार आहे.
यंदाचे वैशिष्ट असे की, दुसरी, तिसरीत जाणारा मुलगाही प्रथमच शाळेची पायरी चढणार आहे. गेले दोन वर्ष ऑनलाइन शिक्षणाला कंटाळलेले मुले यंदा प्रथमच एका स्वच्छंदी वातावरणात आनंददायी शिक्षणाचा अनुभव घेणार आहेत. शिक्षकांसाठी 13 जूनपासून शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली. त्यांनी शालेय आवार, शिक्षक दालने, प्रयोगशाळा स्वच्छ करून प्रवेश उत्सवासाठी वर्ग सज्ज ठेवले आहेत. यंदा मुख्याध्यापकांनीही इयत्ता दहावीच्या वर्गाला अध्यापन करणे अनिवार्य केले आहे.
नवीन वर्ष नव्या उमेदीने नवीन उत्साहाने व नवनवीन उपक्रमाने सुरू करा, असे आदेश शिक्षकांना दिले आहेत. अध्यापन पद्धतीत आमुलाग्र बदल झालेला आहे. विद्यार्थ्यांना काहीच येत नाही असे गृहीत न धरता त्यांना काय अडते ते समजून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. फक्त खडू व फळा एवढेच शैक्षणिक साधन राहिलेली नाहीत. डिजिटल फळा व दृकश्राव्य शैक्षणिक साहित्यांचा वापर करून विद्यार्थ्यांना अध्यापन करावे, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
आदर्श शिशु विहार शाळेत स्वागत
मराठा विद्या प्रसारक समाजाच्या आदर्श शिशु विहार, उत्तमनगर शाळेत शैक्षणिक वर्ष 2022-23 चे उत्साहात स्वागत करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती पवार यांच्या मार्गदर्शनाने शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वागत अनोख्या पद्धतीने करण्यात आले. शाळेतील सर्व परिसर सजविण्यात आला. शाळेच्या आवारात आकर्षक रांगोळी, फुलांचा गालिचा काढण्यात आला, रंगबिरंगी फुग्यांनी सर्वत्र आकर्षक सजावट करण्यात आली.
नाविन्यपूर्ण असे सेल्फी पॉईंट शालेय आवारात करण्यात आले. त्यात आकर्षक छत्री, सेल्फि रिंग, फोटो फ्रेम अशा विविध प्रकारचे पॉईंट उभारण्यात आले. काही विद्यार्थी छान प्राणी, पक्षी, फुले, फळे यांची वेशभूषा करून आले होते. विद्यार्थ्यांचे औक्षण करून तसेच पावलांचे ठसे घेऊन स्वागत केले. त्यांना चॉकलेट देऊन तोंड गोड करण्यात आले.
वर्गात छान गाणी गोष्टी घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी शाळेच्या पहिल्या दिवसाचा आनंद उपभोगला. तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. म.वि.प्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार तसेच सर्व कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी, संचालक मंडळ, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सी. डी. शिंदे यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.