शाळा ‘जवळ’ नसल्याने विद्यार्थी दुरावणार

तीन कि. मी. च्या परीघात शाळाच नाही
शाळा ‘जवळ’ नसल्याने विद्यार्थी दुरावणार


नाशिक | Nashik
तीन हजारांहून अधिक वस्त्या, गावे याठिकाणी तीन किलोमीटर परीघाच्या आत शाळाच उपलब्ध नसल्यामुळे १६ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना लाबंच्या शाळेत जावे लागणार आहे. त्यासाठी शासनाने प्रवास भत्ता देण्याची तयारी दाखवली असली तरी करोनाच्या भीतीमुळे विद्यार्थी शाळेपासून दुरावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्यातील अनेक शाळा कमी पटसंख्येचे कारण देत शासनाने बंद केल्या. मात्र पुढील वर्षी शाळेत जाण्यायोग्य मुलांची संख्या वाढली तरी शाळा सुरू करण्यात आल्या नाहीत. शाळांना पाचवी किंवा आठवीचे वर्ग जोडण्यात आलेले नाहीत, पटसंख्या कमी अशा विविध कारणांमुळे सद्य:स्थितीत राज्यातील ३ हजारांहून अधिक वस्त्या, गावे येथील विद्यार्थ्यांना दूरच्या शाळेत जावे लागत असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.

शिक्षण हक्क कायद्यानुसार कमाल तीन किलोमिटरच्या परिघात विद्यार्थ्यांसाठी शाळा असणे आवश्यक आहे. मात्र, ३,०७३ वस्त्यांतील विद्यार्थ्यांसाठी या परीघात शाळा उपलब्ध नाही. अशा दूरच्या शाळेत जावे लागणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १६ हजार ३३४ आहे. त्यातील १३,९७७ विद्यार्थी ग्रामीण भागांतील आहेत तर २,३५७ विद्यार्थी शहरी भागांतील आहेत.

यातील अनेक विद्यार्थ्यांना तर ३२ किलोमीटर प्रवास शाळेत जाण्यासाठी करावा लागणार आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी शासनाने वाहतुकीची साधने उपलब्ध करून द्यावीत किंवा वाहतूक भत्ता देण्याबाबत निर्णय हाेणार आहे.घरापासून शाळा दूर असणे हे मुलींचे शिक्षण बंद होण्यामागे एक प्रमुख कारण असल्याचे यापूर्वीच्या अहवालांतून समोर आले आहे.

आता त्यात करोनाच्या प्रादुर्भावाची भर पडली आहे. सद्य:स्थितीत शाळा बंद असल्या तरीही जूनपासून नियमित शाळा सुरू करण्याच्यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. मात्र, तेव्हा करोना प्रसाराची स्थिती कशी असेल, अशावेळी शासनाने भत्ता दिला तरी अर्धा ते दीड तासाचा प्रवास करून विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालक तयार होतील का याबाबत शंका आहे.


पटसंख्या अधिक असून सुद्धा...
शासनाच्या धोरणानुसार वीसपेक्षा कमी पट असलेल्या शाळांचे दुसऱ्या शाळेत समायोजन करणे अपेक्षित होते. मात्र, असे करताना जवळपास दुसरी शाळा उपलब्ध आहे, याची खातरजमाही करणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात ३ हजार वस्त्यांपैकी अनेक ठिकाणी विद्यार्थीसंख्या वीस किंवा त्याहून अधिक आहे.

मात्र, तेथील विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार शाळा उपलब्ध झालेल्या नाहीत. काही ठिकाणी शंभरपेक्षाही अधिक पट असल्याचे दिसते आहे. शहरी भागांत जवळपास २१ वस्त्यांमध्ये वीस किंवा त्यापेक्षा अधिक मुलांना शासनाने प्रवास भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे.

यवतमाळ, परभणी, नाशिक, नंदुरबार, नागपूर, जालना, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, अकोला, ठाणे ग्रामीण, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पुणे ग्रामीण, बुलढाणा, बीड, वर्धा, गोंदिया, औरंगाबाद, अहमदनगर येथील जवळपास ६७ वस्त्यांमध्ये वीस किंवा त्यापेक्षा अधिक मुलांना दूरच्या शाळेत जाण्यासाठी प्रवास भत्ता किंवा वाहतुकीची सुविधा दिली जाऊ शकेल.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com