वेळुंजे | Velunje

वसंत ऋतुची चाहूल लागताच नजरेला भुरळ घालणारा पळस सध्या लाल गडद झाला आहे. सध्या या पळसाच्या झाडांनी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली घाट अगदी रमणीय वाटतो आहे.

'फ्लेम ऑफ द इयर' असे वर्णन केलेल्या पळस वृक्षाला सध्या बहर आला आहे. लाल केसरी आणि किंचित पांढऱ्या रंगाच्या फुलांनी बहरलेली पळसाची झाडे सध्या वाटसरूंचे लक्ष वेधून घेत आहे. सध्या हळू हळू जंगलातील पानगळ होण्यास सुरुवात झालेली आहे. तर काही ठिकाणी सावर, पांगारा, मधळ, पळस, अन्य झाडे फुलून त्यांचा दर्प एखाद्या सुवासिक अत्तरा सारखा जंगलात चौफेर सुगंध फैलावत आहे.

पळसाला पाने तीनच अशी म्हण प्रचलित आहे. या पळसाच्या पानांचा आजही लग्न सोहळ्यात पत्रावळी म्हणून उपयोग केला जातो. पळस हा डोंगराळ भागात किंवा शेताच्या बांधावर दिसणारा वृक्ष. या झाडाची वाढ होण्यास विलंब लागत असतो. त्यामुळे सुरवातीला पानांचा उपयोग केला जातो. त्यानंतर ही पाने गळून गेल्यानंतर त्याला फुलांचे धुमारे फुटतात. सध्या पळसाच्या झाडाला अशाच लाल, केशरी फुलांनी वेढा घातलेला दिसून येतो आहे.

तसेच पळसाच्या फुलांचा रंग म्हणूनही वापर केला जातो. फुलांचा रंग गडद असल्याने धुलीवंदनाला फुलांचा रंग तयार केला जातो. तर पळसाची फुले पाण्यात टाकून अंघोळ केल्यास त्वचारोग नाहीसा होत असल्याचे आयुर्वेदात म्हटले आहे. अशा बहुगुणी पळस सध्या लालबुंद झाला आहे.