नाशिक । प्रतिनिधी

राष्ट्रीय स्तरावर खेळणार्या खेळांडूपैकी 90 टक्के खेळाडू छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर घडले आहेत. गरीब मध्यमवर्गीय खेळाडूंसाठी एकमेव अशा असलेल्या या मैदानावर पार्किंग झाल्यास आमचे भविष्य अंधकारमय होईल महापालिका तसेच शासनाने आमचे मैदान आणि भविष्य वाचवावे अशी कळकळीची विनंती खेळाडूंनी केली आहे.

शहरातील सीबीएस, महात्मागांधी रोड परिसरातील पार्किंगचा प्रश्न सोडवण्यासाठी स्मार्टसिटी अंतर्गत महानगर पालिकेने शहरातील मध्यवर्ती क्रिडांगण असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये भुयारी पार्किंगचे नियोजन केले आहे. जर या ठिकाणी पार्किंगचे काम सुरू झाले तर येथील सर्व खेळ बंद करावे लागणार आहेत. तर पुन्हा केव्हा मैदान तयार होईल व तो पर्यंत खेळाडूंनी काय करायचे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

प्रामुख्याने गुणवंत परंतु गरीब खेळाडूंना इतर खासगी प्रशिक्षक व मैदानांची फी भरणे परवडत नाही. अनेक खेळाडू ग्रामिण भागातून एसटीने प्रवास करून या ठिकाणी सरावासाठी येतात. तर अनेक शाळा व महाविद्यालयीन खेळाडू सायंकाळी सुट्टीनंतर येथे येतात. सर्वांना सोयिस्कर, मध्यवर्ती ठिकाणी व परवडणारे मैदान असल्याने या ठिकाणी खेळ सोडून दुसरे काहीच होऊ नये, हे मैदानच नव्हे तर आमचे भविष्यही वाचवा अशी कळकळ खेळाडू व्यक्त करत आहेत.

खेळांडूसह क्रीडा क्षेत्रावर अन्याय

छत्रपती शिवाजी स्टेडियमशी नाशिकच्या प्रत्येक खेळाडूची नाळ जोडली गेलेली आहे. पुर्वी स्कुल मैदान म्हणून ओळखले जाणारे हे मैदान जिल्हा परिषदेने क्रीडांगण म्हणुन जाहिर केले. तसेच करारावर जिल्हा क्रीडाअधिकारी कार्यालयाकडे दिले आहे. सध्या दिसत असलेले मैदान तयार करण्यासाठी क्रीडा विभागाने खूप कष्ट घेतले आहेत. यासाठी महापालिका अगर इतरांचे योगदान अल्प आहे. असे असताना खेळास मदत करण्याऐवजी मैदान तोडणे हा खेळाडूंसह खेळावरच अन्याय आहे.

सुर्यभान घोलप, आंतरराष्ट्रीय रोईंगपटू

खेळाडूंचे भविष्य अंधकारमय

नाशिकचे देश तसेच अांतरराष्ट्रीय स्तरावर जे नाव झाले आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचे योगदान सर्वात मोठे आहे. या स्तरावर खेळणारे खेळाडू घडवण्याचे काम या स्टेडियमने केले आहे. खेळाचे स्पीरीट असलेल्या ग्रामिण भागातील खेळाडूंना पुढे येण्याची संधी या मैदानामुळे मिळाली आहे. तर येथे राहूनच अनेकांनी राष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या आहेत. येथे पार्किंग झाल्यास सर्व खेळाडूंचे भविष्य अंधकारमय होईल

प्रियांका पगारे, राष्ट्रीय हॉलीबॉलपटू

आज राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध खेळात नाशिकचे खेळाडू चमकत आहेत. जिल्ह्याचे नाव जागतिक स्तरावर पोहचले आहे. गरीब घरातील खेळाडूंना एकमेव या स्टेडियमचा आश्रय आहे. जर या ठिकाणी पार्किंग झाले तर गरीब खेळाडूंना उभे राहिलाही जागा मिळणार नाही. खेळाडूंना खेळण्यासाठी क्रीडांगणे नाही राहिली तर या सर्वात नाशिकची मोठी पिच्छेहाट होईल. जिल्ह्यातील सर्व खेळाडूंसाठी छत्रपती शिवाजी स्टेडियम जिल्ह्यातील हे एकमेव मध्यवर्ती व महत्वपुर्ण क्रीडा संकूल आहे.

आकाश परदेशी, राष्ट्रीय हॉलीबॉलपटू

गरीब खेळाडूंवर अन्याय

जिल्ह्यातील ग्रामिण भागातील, गरीब, आदिवासी क्षेत्रातील कौशल्य असलेले खेळाडूंना खासगी महागडी क्रिडांगणे, कोच, साहित्य हे परवडणारे नाही. त्यांच्यासाठी शासकीय प्रशिक्षक व हक्काचे मैदान हे छत्रपती शिवाजी स्टेडियम आहे. अनेक ग्रामिण खेळाडू एसटीने जाऊन येऊन सराव करतात. सीबीएस जवळ असल्याने त्यांना हे शक्य होते. या मैदानात जर पार्किंग झाले तर सर्वात मोठा आघात गरीब खेळाडूंवर होणार आहे. अशा खेळाडूंचा खेळ संपण्यास वेळ लागणार नाही.

नेहा पुरकर, राष्ट्रीय हॉलीबॉलपटू