सतीश खरेंनी घेतला जिल्हा उपनिबंधकपदाचा पदभार
नाशिक

सतीश खरेंनी घेतला जिल्हा उपनिबंधकपदाचा पदभार

Vijay Gite

Vijay Gite

नाशिक । Nashik

नाशिकच्या जिल्हा उपनिबंधकपदी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सतिश खरे यांची बदली झाली आहे. जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे मात्र पदभार सोडण्यास तयार नसल्याचे समजते. त्यामुळे आता खुर्चिचा खेळ रंगणार का याबाबत सहकार क्षेत्रात चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, खरे यांनी जिल्हा उपनिबंधक म्हणून मंगळवारी (दि.11) पदभार स्विकारला असून गौतम बलसाणे मात्र याविरोधात ‘मॅट’कडे दाद मागणार असल्याचे समजते.

प्रशासकीय बदल्या राज्यात सुरू असून सोमवारी (दि.10) नाशिक जिल्हा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) सतिश खरे यांची नाशिक जिल्हा उपनिबंधक म्हणून बदली झाली. तर जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांची विभागीय उपनिबंधक कार्यालयात मूळ पदावरच बदली झाली आहे. बलसाणे हे दोन वर्षांपूर्वीच जिल्हा उपनिबंधक म्हणून नाशिकमध्ये रुजू झाले आहेत. त्यामुळे किमान तीन वर्ष झाल्यानंतर त्यांची बदली होणे अपेक्षित होती. वा पदोन्नतीनेच त्यांची बदली झाली असती. मात्र, असे न होता त्यांची बदली झाली आहे.

त्यामुळे बलसाणे यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट)कडे जाण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. खरे यांनी मंगळवारी (दि.11) तातडीने पदभार स्विकारत कामकाज सुरु केले आहे. परंतु, बलसाणे यांनी विभागीय उपनिबंधक कार्यालयात अद्याप पदभार स्विकारलेला नाही. खरे यांना यशजिल्हा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक असतानाही खरे यांचे जिल्हा उपनिबंधक होण्यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. मात्र, त्यांना वारंवार नकार मिळाला होता.

दोन वर्षांच्या प्रयत्नानंतर त्यांना उपनिबंधकपद मिळविण्यात यश आल्याचे बोलले जाते. मात्र, एकाच पदावर दोन अधिकारी असल्याने येथेही पुन्हा खुर्चिचा खेळ सुरु झाला आहे. बलसाणे यांनी ‘मॅट’कडे दाद मागितल्यास कोणाच्या बाजूने निकाल लागतो, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहणार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com