देशदूत - नवदुर्गा : कुटुंबाच्या आनंदासाठी काम केल्याचे समाधान

वाहनचालक ज्योती देसले यांचे मनोगत
देशदूत - नवदुर्गा : कुटुंबाच्या आनंदासाठी काम केल्याचे समाधान

नाशिक । प्रतिनिधी Nashik

कुटुंबासाठी काही करू शकतो, याचा आनंद इतर अनेक गोष्टींपेक्षा लाख मोलाचे सुख-समाधान देतो. अशावेळी थकवा आला तरी नव्या उमेदीने काम करण्याचा हुरूप कायम जागा राहतो, असे मनोगत शालेय महिला वाहनचालक ज्योती देसले Female driver Jyoti Desale यांनी व्यक्त केले. ‘देशदूत नवदुर्गा’ उपक्रमात Deshdoot Navdurga Campaign कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी देसले यांच्याशी संवाद साधला.

शालेय किंवा बरीच मोठी वाहने शक्यतो पुरुष चालवतात. या अशा व्यवसायात ज्योती देसले यांनी फक्त पैसे कमावणे हे उद्दिष्ट न ठेवता आपल्या मुलीच्या काळजीसाठी उडी घेतली. आई म्हणून मुलीच्या काळजीतून मुलीला शाळेच्या व्हॅनमध्ये आणि शाळेच्या बसमधून पाठवण्याऐवजी त्यांनी स्वतः मुलीला शाळेत सोडण्याचा निर्णय घेतला. यात वेगळेपण होते की, त्यांनी फक्त आपल्या मुलीला नियमित शाळेत सोडण्याबरोबर इतर अनेक विद्यार्थ्यांना शाळेपर्यंतचा प्रवास घडवला. त्यासोबत त्यांच्या नव्या वाटेची सुरुवात झाली.

सुरुवातीला हे करण्यासाठी घरून सहकार्य मिळेल की नाही म्हणून त्यांनी घरच्यांच्या नकळत ड्रायव्हिंगचे धडे घ्यायला सुरुवात केली, पण हे सर्व सुरू करण्याआधी घरी सांगितले तेंव्हा काळजीपोटी विरोध होता. परंतु एक स्त्री घरच्या इतर कामांसाठी गाडी चालवू शकते तर शालेय वाहन का नको म्हणून घरच्यांना विश्वासात घेतले. त्यानंतर पुढे आजपर्यंत वेगवेगळ्या टप्प्यावर त्यांचे नेहमी प्रोत्साहन मिळत आहे, असे देसले यांनी सांगितले.

सुरुवात तर केली होती, पण मुले मिळतील का, हा प्रश्न होता. तोही निकाली निघाला. कारण मुलीला सोडायला सुरुवात केली तेव्हा तिच्या समवयस्क, सोबतच्या मैत्रिणींच्या घरच्यांनी त्यांच्या मुलांना माझ्या वाहनातून सोडण्यासाठी संपर्क साधला. पुढे ही नाळ कायम जोडत राहिली, असे त्या म्हणाल्या. पहिल्या दिवसाच्या प्रवासाचा अनुभव त्यांनी सांगितला. त्यावेळी पावसाळा होता.

मुसळधार पाऊस पडत होता, पण पहिल्याच दिवशी कोणत्याही परिस्थितीत संकटावर मात करून घेतलेले काम, मुलांना सुखरुप आणि वेळेवर शाळेत सोडण्यासाठी माझी किती तयारी आहे हे पाहणार्‍या परीक्षेत मी पास झाले. आता कोणत्याही अडथळ्यासाठी तयार आहे. स्वत: वाहनातील लहान दुरुस्ती, वाहनांचे टायर बदलणे आणि इतर सर्व मूलभूत गोष्टी ज्या व्हॅन चालकाला माहीत असाव्यात त्या सहतेने हाताळू शकते, असे देसले यांनी सांगितले.

आज गेल्या नऊ वर्षांपासून दरवर्षी 70 एक मुलांसोबतचा प्रवास आजही तितक्याच सक्षमतेने चालवत असल्याचा अनुभव, आनंद, अभिमान आणि लहानग्यांची सोबत खुप काही शिकवत आले आहे. काम आव्हानात्मक असल तरी स्कूल व्हॅन चालक म्हणून आजवरच्या कारकीर्दीने वेळ व्यवस्थापन आणि मॅपिंगच कौशल्य विकसित केल्याचेही त्यांनी सांगितले.

कामाचा अभिमान

कधी-कधी थकवा येतो, पण आता हे माझे कुटुंब आहे आणि माझ्यावर मुलांची जबाबदारी आहे. आपण आपल्या कुटुंबासाठी काहीही केले पाहिजे, हाच मंत्र बळ देतो. करीत असलेल्या कामाविषयी अभिमान वाटतो आणि एक आत्मिक समाधान देतो, असे ज्योती देसले म्हणाल्या.

Related Stories

No stories found.