समको बँक निवडणुक चुरशीची होणार

दोन्ही गटांकडून पॅनल निर्मितीसह मोर्चेबांधणीस सुरवात
समको बँक निवडणुक चुरशीची होणार

सटाणा | शशिकांत कापडणीस

सटाणा मर्चन्टस् को-ऑप. बँकेची निवडणूक (Satana Merchants Co-op. Bank election)रणधुमाळी सुरू झाली असून शहरासह तालुक्यातील विविध क्षेत्रातील पदाधिकारी मैदानात उतल्यामुळे निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

सहकार क्षेत्रातील बँकेची निवडणूक असली तरी सत्ताधारी गटाचे आदर्श पॅनल व विरोधकांचे सिध्दीविनायक पॅनलवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष राजकीय पक्षांचा देखील प्रभाव आहे. सन 2015 ते 2020 पर्यंत समको बँकेच्या एकुण 17 संचालकांपैकी वेगवेगळ्या कारणांनी झालेली अपात्रतेची कारवाई व राजीनाम्यामुळे रमेश देवरे, अशोक निकम, राजेंद्र अलई, यशवंत अमृतकार, दिलीप येवला, डॉ. विठ्ठल येवलकर, किशोर गहिवड आदी संचालक बँकेच्या वर्तुळातून बाहेर पडले होते.

करोना( Corona ) संसर्गामुळे समको बँकेला दोन वर्षे मुदतवाढ मिळाली तसेच काही काळ प्रशासकाच्या नेतृत्वात बँकेचे कामकाज झाले. कार्यकाळ पुर्ण झालेल्या संचालक मंडळात चेअरमन कैलास येवला, व्हा. चेअरमन कल्पना येवला, पंकज ततार, जयवंत येवला, शरद सोनवणे, दिलीप चव्हाण, प्रविण बागड, रूपाली कोठावदे, प्रकाश सोनग्रा, जगदीश मुंडावरे आदींचा सहभाग होता. सद्यस्थितीत समको बँकेचे माजी चेअरमन रमेश देवरे, श्रीधर कोठावदे, देवमामलेदार देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड आदींच्या नेतृत्वातून आदर्श पॅनलची निर्मिती करण्यात आली असून विरोधी गटातर्फे डॉ. विठ्ठल येवलकर, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब सोनवणे, डॉ. दिग्वीजय शाह, बाळासाहेब भांगडिया, मयूर अलई आदींच्या नेतृत्वातून सिध्दीविनायक पॅनल निर्माण करण्यात आले आहे.

गेल्या दोन दशकांपासून बँकेत सत्ताधारी गटाला आव्हान देण्यासाठी विरोधकांचे प्रयत्न सुरू असले तरी अनेक वर्षांपासून प्रस्थापित घटकांचे बँकेच्या सभासदांमध्ये असलेले नातेगोते व संबंधांचा या निवडणुकीतील प्रभाव सातत्याने निर्णायक ठरला आहे. एकुण 17 संचालकांसाठी होत असलेल्या निवडणुकीत सर्वसाधारण 12, अनुसुचित जाती-जमाती 1, महिला 2, इतर मागासवर्ग 1, भटक्या विमुक्त जाती-जमाती 1 अशा स्वरूपात संचालक मंडळाची निवडणूक होणार आहे. नामांकन अर्ज दाखल करण्याच्या अंतीम मुदतीत 17 जागांसाठी 91 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. दि. 12 मेपासून 19 मेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल येऊन दि. 20 मेरोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. दि. 23 मेरोजी उमेदवारांची अंतीम यादी प्रसिध्द करण्यात आली. दि. 23 मेपासून 6 जूनपर्यंत माघारीचा कालावधी असल्यामुळे खर्‍या अर्थाने 6 जूननंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.

आदर्श व सिध्दीविनायक या दोन्ही पॅनलमध्ये उमेदवारीसाठीइच्छुकांतर्फे मोर्चेबांधणी करण्यात येत असली तरी दोन्ही पॅनलचे बहुतांश उमेदवार निश्चित झाल्याचे चित्र आहे. एैनवेळी त्यात काही बदल होतात की काय? याबद्दल सभासदांमध्ये उत्सुकता आहे. बँकेच्या गेल्या कालावधीत सत्ताधार्‍यांवर विरोधकांतर्फे होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे बँक शहरासह तालुक्यात सातत्याने चर्चेत होती. निवडणूक प्रचारासाठी कालावधी कमी असल्यामुळे इच्छुकांची दमछाक होत आहे.

बँकेतील पडद्यामागच्या राजकारणामुळे पॅनलमध्ये सहभागी होवू न शकलेल्या प्रस्थापित संचालकांची यात नेमकी काय भूमिका असेल; याबाबत तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत. गेल्या दोन दशकांपासून बँकेत सत्तेवर असलेल्या प्रस्थापितांना आव्हान देण्यासाठी विरोधकांनी देखील सामाजिक समतोल राखत नवोदित व प्रबळ उमेदवारांची मोट बांधली आहे. यात दोन्ही पॅनलमधील चुरशीच्या निवडणुकीत विजयश्री कुणाला प्राप्त होते; याचे चित्र दि. 15 जूनरोजी मतदान व दि. 16 जूनरोजी मतमोजणीनंतर स्पष्ट होईल. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून देवळा तालुक्याचे सहाय्यक निबंधक सुजय पोटे कामकाज करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com