सिन्नर । वार्ताहर

गावचा कारभारी नेमका कोण हे ठरविण्यासाठी इच्छुकांसह ग्रामस्थांचे लक्ष लागून असलेल्या 50 टक्के महिला सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीला अखेर मुहूर्त लागला आहे. शुक्रवारी ( दि. 5) दुपारी 3 वाजेला सिन्नर तहसील कार्यालय येथे प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार्या बैठकीत महिला सरपंचपदाची आरक्षण सोडत होणार असल्याची माहिती तहसीलदार राहुल कोताडे यांनी दिली...

तालुक्यातील 100 ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुका नुकत्याच संपन्न झाल्या असून 2025 पर्यंत मुदत संपणार्या 114 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची प्रवर्गनिहाय आरक्षण स्थिती जाहीर करण्यात आली आहे.

ग्रामपंचायत निकालानंतर सर्वांच्या नजरा सरपंच पदाच्या आरक्षणाकडे लागल्या होत्या. मात्र 28 जानेवारीला केवळ प्रवर्गानिहाय आरक्षण जाहीर झाल्याने महिलांसाठीच्या 50 टक्के आरक्षणाची सोडत अद्यापही बाकी आहे. त्यामुळे गावचा कारभारी कोण याचा निर्णय मात्र अद्यापही बाकी आहे.

महिला आरक्षण सोडतीसाठी 3 फेब्रुवारी ही तारीख जाहीर करण्यात आली होती. मात्र नाशिक जिल्ह्यात राज्यपाल यांच्या शासकीय दौर्यामुळे महिला आरक्षण सोडतीची तारीख पुढे ढकलल्याने इच्छुकांचा जीव भांड्यात पडला होता. दरम्यान जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार निफाड प्रांताधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि.5) सिन्नर तहसील कार्यालय येथे दुपारी 3 वाजेला सदर आरक्षण जाहीर होणार आहे.

त्यासाठी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1964 अन्वये तालुक्यातील 114 ग्रामपंचायतींमधील प्रवर्गनिहाय आरक्षण संख्या निश्चित करण्यात आली असून 114 ग्रामपंचायतीं पैकी 58 सरपंचपदे ही महिलांसाठी आरक्षीत ठेवण्यात आली आहे.

आरक्षण सोडतीसाठी तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रांताधिकारी अर्चना पठारे, तहसिलदार राहुल कोताडे, नायब तहसिलदार दत्ता जाधव यांनी केले आहे.