मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

मालेगाव तालुक्यातील 125 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण सोमवार (दि. 14) डिसेंबररोजी सोडत पद्धतीने निश्चित केले जाणार असल्याची माहिती तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

मालेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सन 2020 ते 2025 मध्ये होणार्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेता बिगर अनुसूचित क्षेत्रात येणार्या ग्रामपंचयातींच्या सरपंच पदाचे आरक्षण मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 30 नुसार करणेबाबत शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

तालुक्यातील 125 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची कार्यवाही करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पुढील आदेशापावेतो स्थगित ठेवण्यात आली होती. सरपंच पदाचे आरक्षण निश्चितीबाबत शासनाचे निर्देश प्राप्त झाल्यामुळे मालेगाव तालुक्यातील 125 ग्रामपंचायतीची सोडत पद्धतीचे सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी सोमवार 14 डिसेंबर 2020 निश्चित करण्यात आल्याची माहिती तहसीलदार राजपूत यांनी दिली.

तालुक्यातील अनुसूचित क्षेत्राबाहेरील ग्रामपंचायत सरपंच पद सुधारीत आरक्षण 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2025 असून तालुक्यातील ग्रामपंचायती संख्या 125 आहे. अनुसूचित क्षेत्राबाहेरील ग्रामपंचायतीची संख्या 125 आहे.

अनुसूचित जातीसाठी आरक्षित सरपंच पदांची संख्या 7 तर अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंच पदे 20, मागास प्रवर्ग नागरिकासाठी आरक्षित सरपंच पदे (27 टक्के) एकूण 34 व सर्वसाधारण सरपंच पदे 64 आहेत. तालुक्यातील ग्रामपंचात सरपंच पदाच्या आरक्षण निश्चित करण्यासाठी दिलेल्या मुदतीत कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन तहसिलदार राजपूत यांनी पत्रकाच्या शेवटी केले आहे.