अखेर घोटी खुर्दच्या सरपंच मंदाकिनी गोडसे यांचे पद संपुष्टात

कुणबी जातीचा दावा अवैधच
अखेर घोटी खुर्दच्या सरपंच मंदाकिनी गोडसे यांचे पद संपुष्टात
सरपंच मंदाकिनी गोडसे-कोकणे

इगतपुरी । Igatpuri

इगतपुरी तालुक्यातील अत्यंत संवेदनशील असणाऱ्या घोटी खुर्द ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच मंदाकिनी गोडसे यांना सरपंच पदावरून पायउतार करण्याचा आदेश बजावण्यात आला आहे. त्यांचे कुणबी जातीचे जातप्रमाणपत्र नाशिकचे जिल्हाधिकारी यांनी अखेर रद्द केले असुन तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मंदाकिनी गोडसे यांचे पद रिक्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. गोडसे यांच्याकडून उच्च न्यायालयात जैसे थे ठेवण्याबाबतचा दावा अनिर्णित असल्याचे समजते.

मंदाकिनी गोडसे यांचा इतर मागास प्रवर्गातील कुणबी जातीचा दावाही अवैध ठरविण्यात आल्याचा आदेश नाशिकच्या जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने दिला होता. या विरोधात मंदाकिनी गोडसे यांनी हायकोर्टात अपील दाखल केले होते. मात्र तेथेही त्यांचे अपील हायकोर्टाने फेटाळल्याची प्रत जिल्हाधिकारी यांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी मंदाकिनी गोडसे यांचे सरपंच पद रद्द केल्याचा आदेश काढल्याने अखेर मंदाकिनी गोडसे यांचे सरपंच पद संपुष्टात आले आहे.

माजी ग्रामपंचायत सदस्य आत्माराम फोकणे यांनी थेट सरपंच मंदाकिनी गोडसे यांच्या विरोधात जातप्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार केली होती. वर्षभरापासून अनेकदा झालेल्या सुनावण्यांद्वारे दोन्ही पक्षकारांना आपली बाजु मांडण्याची संधी देण्यात आली होती. नाशिकच्या जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष प्रकाश पाटोळे, सदस्य माधव वाघ, सदस्य सचिव संगीता डावखर यांच्या त्रिसदस्यीय समितीने थेट सरपंच मंदाकिनी गोडसे यांचे जातप्रमाणपत्र रद्द करून त्यांच्या जातीचा दावा अवैध ठरविला.

आदेशाच्या प्रती नाशिकचे जिल्हाधिकारी, इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे उपविभागीय अधिकारी, इगतपुरीचे तहसीलदार यांना पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडून मंदाकिनी गोडसे यांचे थेट सरपंचपद रद्द करण्यात आले. थेट सरपंचपदावरच गंडांतर आल्याने पुन्हा निवडणुक होईल की सदस्यांमधून सरपंच निवडला जाईल ह्याबाबत इगतपुरी तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com