सप्तशृंगीगड | Saptsrungigad

घटस्थापना करून आदिशक्तीच्या नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत असतो. आद्यशक्तीपीठ असलेल्या वणीच्या सप्तश्रृंगीगडावरही शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली.

यात पहाटे पासून विविध धार्मिक पूजा-अर्चा यासह महावस्त्र व देवीच्या अलंकारांची पूजा करत साधेपणाने मिरवणूक काढण्यात आली.

सप्तश्रृंगगडावर सालाबाद प्रमाणे साजरा होणारा देवीचा नवरात्रोत्सव करोना संसर्ग महामारीच्या पार्श्वभूमीवर रद्द झाला असला तरी अतिशय धार्मिक वातावरणात आज गडावर देवीची पंचामृत महापूजा झाल्यानंतर घटस्थापना करत आदिशक्तीच्या नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे नवरात्र उत्सवासाची परंपरा खंडित झाली. भाविकांच्या आवाजाने दुमदुमून जाणारा मंदिर परिसर व सर्व गावांत परिसरातील भक्तिमय सोहळ्याला उपस्थित राहू न शकल्यामुळे भाविक भक्तांनी विविध माध्यमातून खंत व्यक्त केली.

या मंदिर बंदच्या काळात भाविकांसाठी देवी संस्थानच्या माध्यमातून यु ट्यूब, तसेच संस्थानच्या फेसबुक पेजवरील https://youtu.be/4-GliYbieBU या संकेतस्थळावर २४ तास ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.

हा नवरात्रोत्सव अगदी साध्या पद्धतीने व शासनाच्या आदेशाचे काटेकोर पालन करून सोशल डिस्टंसिंगचे पालन करून पुरोहित वर्गाच्या हस्ते पारंपारिक पद्धतीने देवीची पंचामृत महापूजा करण्यात आली. तसेच भगवती मंदिरात घटस्थापना करण्यात आली.

यावेळी ट्रस्ट चे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे आदींसह पुरोहित वृंद उपस्थित होते.