कळवण/सप्तशृंगीगड । Saptsrungigad

साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेला सप्तशृंगी गडाचा तीर्थक्षेत्र ‘ब’ वर्ग दर्जात समावेश करण्यात आला आहे, यामुळे गडावरील वरील विविध विकासकामांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद महाविकास आघाडी सरकारतर्फे करण्यात आल्याने गडाचा कायापालट होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

गडावरील जवळपास 374 हेक्टर क्षेत्र वनविभागाच्या कक्षेत येत आहे. अवघे 9 हेक्टर क्षेत्र सप्तशृंगगड ग्रामपंचायती अंतर्गत येते उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या सप्तशृंगगडावर दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत आहे. सप्तशृंगगड 2001 पासून ‘क’ वर्ग दर्जाचे तीर्थक्षेत्र होते. सप्तशृंगगडावर येणार्या भाविकांच्या तुलनेत उपलब्ध सुविधांची कमतरता असल्याने मोठ्या प्रमाणात गैरसोय होते.

अंतर्गत रस्ते आणि पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवते. भगवती मंदिर परिसरातील विकास कामांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून अतिशय अल्प निधी मिळतो. त्यामुळे कामे करण्यास मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत असल्यामुळे सप्तशृंगगड तीर्थक्षेत्रास ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळावा, यासाठी ग्रामपंचायतीने कृषीमंत्री दादा भुसे, माजी आमदार जे. पी. गावित, आमदार नितीन पवार यांच्या माध्यमातून ग्रामस्थांनी पाठपुरावा केल्यामुळे सप्तशृंगी गडास ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला. तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत सप्तशृंगगडास सुमारे 25 कोटींचा निधी प्राप्त होणार आहे.

श्री क्षेत्र सप्तशृंगगड विकास आराखडा तीन वर्षांपासून शासनस्तरावर प्रलंबित आहे. सातत्याने पाठपुरावा सुरु असून आता खर्या अर्थाने निधीची तरतूद होणार आहे. महाविकास आघाडी सरकारने निधीची तरतूद केलुयामुळे कामांना चालना मिळणार आहे.

- राजेश गवळी, ग्रामपंचायत सदस्य

गडावर देवीच्या दर्शनासाठी संपूर्ण देशातून लाखो भाविक वर्षभरात हजेरी लावतात. येणार्या भाविकांच्या संख्येच्या मानाने येथे मूलभूत सुविधांची वानवा आहे. त्यामुळे ब दर्जा मिळाल्याने प्रलंबित कामांना मंजुरी मिळून कामे सुरु व्हावे. शासनाच्या निर्णयाचे नागरिकांनी स्वागत केले आहे.

- संदीप बेनके, ग्रा. प. सदस्य