मुंबई l Mumbai

आयपीएल २००८ ह्या हंगामाचा विजेता संघ राजस्थान रॉयल्स संघाने आगामी २०२१ च्या हंगामाचे कर्णधारपद युवा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन याच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.

राजस्थान रॉयल्स संघाला आयपीएल २०२० च्या तेराव्या हंगामात आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. राजस्थान रॉयल्स संघाचा माजी कर्णधार आणि फलंदाज स्टीव्ह स्मीथ कर्णधार आणि फलंदाज म्हणूनही अपयशी ठरला होता म्हणून संघव्यवस्थापनाने स्टीव्ह स्मीथला बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

तसेच श्रीलंका संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज कुमार संगकारा याची टीम डायरेक्टर म्हणून निवड केली आहे. राजस्थान संघाचे मालक मनोज बडाले यांनी स्वतः याबद्दल खुलासा केला आहे.

गत हंगामात संजू सॅम्सनने १४ सामन्यांमध्ये एकूण ३७५ धावा काढल्या होत्या. तसेच डोमेस्टिक क्रिकेटमध्ये तो केरला या संघाचा कर्णधार आहे. आयपीएलमध्ये तो राजस्थान रॉयल्स संघाचा आघाडीचा यष्टीरक्षक फलंदाज आहे.

२०१४ च्या अंडर १९ विश्वचषकामधे त्याने भारतीय संघाचे उपकर्णधारपद भूषविले आहे. येणाऱ्या भविष्याचा विचार करता राजस्थान रॉयल्स संघाने संघाचे नेतृत्व संजू सॅमसनयाच्या खांदयावर सोपवण्याचा विचार संघाव्यस्थापनाने घेतला आहे.

तसेच विजय हजारे करंडक स्पर्धेमध्ये द्विशतक झळकावणारा तो एकमेव यष्टीरक्षक फलंदाज आहे. त्याने विजय हजारे करंडकात गोवा संघाविरुद्ध २१२ धावांची खेळी उभारली होती.

सध्या भारतात सुरु असलेल्या सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत तो केरला संघाचे नेतृत्व करत आहे. त्याने भारतीय संघाकडून पदार्पण २०१५ मध्ये केले होते. आपला पहिला सामना त्याने १९ जुलै २०१५ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध खेळला होता. तर अखेरचा सामना ८ डिसेंबर २०२० रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला होता.

सलिल परांजपे, देशदूत, नाशिक