समृद्धीच्या ब्लास्टिंगमुळे घरांना तडे तर पिकांचे नुकसान

धामणी येथील घटना.
समृद्धीच्या ब्लास्टिंगमुळे घरांना तडे तर पिकांचे नुकसान

घोटी | Ghoti

इगतपुरी तालुक्यातुन मुंबई नागपुर समृद्धि महामार्ग जात आहे. या रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरु असुन काही ठिकाणी रस्ता बनवतांना खडक बाजुला करण्यासाठी ब्लास्टींगचा वापर केला जात आहे.

ब्लास्टींगला परवानगी असली तरी प्रमाणापेक्षा मोठ्या प्रमाणात ब्लास्टींगचे काम होत असल्याने तालुक्यातील धामणी गावातील नागरिकांच्या घराला तडे गेले आहेत. या ब्लास्टिंगमुळे दगड थेट घरावर पडत असल्याने घराची कौले व पत्रे फुटत आहेत. तसेच शेतातील शेतमालाचेही नुकसान होत असल्याचे चित्र आहे.

समृद्धि महामार्गात जमीन गेल्यामुळे आधीच शेतकरी भुमीहीन झाला आहे. जमीनीच्या मोबादल्यात मिळालेल्या पैशातुन येथील शेतकऱ्यांनी नवीन घरे बांधली आहेत. आता या महामार्गाच्या कामामुळे राजाराम भोसले, संदीप भोसले, पंढरीनाथ भोसले, रामचंद्र भोसले, परशुराम भोसले, किरण काळे, गणेश काळे, शिवाजी भोसले, केशव भोसले आदींच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

त्याचप्रमाणे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील टमाटा व काकडी पिकांवर दगड व माती पडल्याने शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले. या दोहोंची नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी धामणी येथील सरपंच गोतम भोसले यांनी तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना याबाबत माहीती दिली.

आज तहसीलदार परमेश्वर कासुळे, सहायक पोलीस निरीक्षक जालींदर पळे यांनी यावेळी धामणी येथे भेट देऊन पाहणी केली. विशेष म्हणजे ब्लास्टींगसाठी वापरण्यात येणारा जिलेटीनचासाठा बेवारस पडुन असुन या ठिकाणी सुरक्षारक्षक नसल्याने मोठी जीवतहाणी होण्याची शक्यता येथील नागरीक व्यक्त करीत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com