
वावी | वार्ताहर | Vavi
समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) टप्पा क्रमांक दोन शिर्डी ते इगतपुरी तालुक्यातील भरवीर पर्यंतच्या मार्गाचे आज उद्घाटन झाले. या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदने देण्यात आली. दोन वर्षापासून दिलेल्या निवेदनावर कारवाही न केल्याने सायाळे येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय शिंदे दुसंगवादी सरपंच कानिफनाथ घोटेकर, भास्कर कहांडळ आदींनी आंदोलनाचा पवित्रा हातात घेतला आहे...
समृद्धी महामार्ग अर्थात मुंबई- नागपूर या महामार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले असून नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनावेळी देखील सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गावर येत सरकारचा निषेध नोंदवला होता. त्यावेळी शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ तसेच जिल्हाधिकारी यांना वारंवार निवेदने देऊन केवळ आश्वासने देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली होती, असा आरोप सिन्नर तालुक्यातील सायाळे येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय शिंदे, कानिफनाथ घोटेकर यांनी केला आहे.
मागील दोन वर्षापूर्वी च्या कालावधीत स्वतः डॉ. शिंदे यांनी तब्बल नऊ ते दहा वेळा शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उपोषण केले होते. अद्याप पर्यंत कोणताही सकारात्मक निर्णय शेतकऱ्यांच्या बाजूने झाला नसल्याचे डॉ. शिंदे घोटेकर यांचे यांचे म्हणणे आहे.
शेतकऱ्यांच्या मागण्या जो पर्यंत मार्गी लागत नाही. मुख्यमंत्री जो पर्यंत भेटत नाही तो पर्यंत आंदोलन मागे नाही, या भूमिकेवर ठाम असल्याने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अभियंता विजयकुमार काळे, उपभियांता लिंबादास बोरसे व वावी पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांच्या मध्यस्तीने आज सायंकाळी ४ वाजेच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घडवून आणली.
या दरम्यान मुख्यमंत्री यांना समृद्धी महामार्गाबाबतचे व महामार्गाबाजूस असणाऱ्या शेतकऱ्यांचे निवेदन देण्यात आले. लवकरच बैठक लाऊ असे यावेळी या शेतकऱ्यांना आश्वासन देण्यात आले. असे न झाल्यास सरकारच्या विरोधात पुन्हा समृद्धी महामार्ग शेजारी उपोषण आंदोलन करण्यात येईल असा इशारा डॉ. शिंदे, कानिफनाथ घोटेकर,भास्कर कहांडळ, नितीन अत्रे, राजू पवार, विलास पांगारकर आदींनी दिला आहे. यावेळी वावी पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबत ठेवण्यात आला होता.
'या' आहेत मागण्या
समृद्धी महामार्ग लगत शेतकन्यांना ये-जा करण्यासाठी दोन्ही बाजूंनी १० फूट रुंदीचा वहिवाट रस्ता मिळावा, समृद्धी महामार्गचे काम चालू असताना वेगवेगळ्या अपघातांमध्ये तालुक्यातील दहा जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांच्या कुटुंबातील एका सदस्याला रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून समृद्धी प्रकल्पात उपलब्ध होणाऱ्या नोकरीमध्ये संधी देणे, अडवले गेलेले पाण्याचे नैसर्गिक प्रवाह सुरळीत करून शेतजमिनीचे होणारे नुकसान टाळणे, समृद्धी महामार्गाच्या कामासाठी वापरण्यात आलेल्या स्थानिक रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून देणे.