जिल्ह्यातील सलून दुकानदारांची कैची ठप्प

लाॅकडाउनमुळे उपासमार : उपोषणाचा पवित्रा
जिल्ह्यातील सलून दुकानदारांची कैची ठप्प

नाशिक । Nashik

करोना संसर्गाची सुनामी रोखण्यासाठी राज्यात पुन्हा एकदा लाॅकडाऊन जारी असून तिचा सर्वाधिक फटका सलून दुकानदारांना बसला आहे.

दुकाने बंद ठेवावी लागल्यामुळे जिल्ह्यातील चार ते पाच हजार सलून दुकानदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. रिक्षा व फेरीवाल्यांप्रमाणे राज्य शासनाने सलून दुकानदारांना आर्थिक मदत घोषित करावी अशी मागणी संघटनेने केली आहे.

१५ एप्रिलपासून राज्यात १५ दिवसांचा लाॅकडाऊन जारी केला असून अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद आहेत. मात्र,नाशिक शहर व जिल्ह्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाप्रशासनाने अगोदरच मिनी लाॅकडाऊन जारी केला होत‍ा. त्यामुळे जवळपास महिनाभरापासून शनिवारी व रविवारी सलूनची दुकाने बंद ठेवण्यास सांगितली होती.

किमान रविवारी दुकाने उघडे ठेवण्याची परवानगी दयावी, अशी मागणी सलून संघटनेने जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती. मात्र, त्यानंतर राज्य शासनानेच राज्यात १५ दिवस लाॅकडाऊन घोषित केला. त्यामुळे सलून दुकाने बंद असून उदरनिर्वाह करायचा कसा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला आहे.

रविवार कटिंग व दाढि करण्यासाठी सर्व दुकाने हाऊसफुल असतात. मात्र तब्बल महिनाभरापासून शटर डाऊन असल्याने सलून दुकानरांची उपासमार होत आहे. दुकानांचे भाडे, कारागिरांचे वेतन व इतर खर्च भागविण्यासाठी पैसे आणायचे कोठून, असा प्रश्न दुकानदारांना सतावत आहे. सरकारने फेरिवाले, रिक्षावाले व अन्य घटकांना आर्थिक मदत जारी केली आहे.

मात्र, त्यात सलून दुकानदारांचा कोणताही विचार करण्यात आला नाही. त्यामुळे सलून दुकानदारांमध्ये नाराजी असून सरकारने आर्थिक मदतीचा विचार केला जावा, अशी मागणी सलून दुकानदार संघटनेकडून केली जात आहे.

वर्षभरापासून टांगती तलवार

मागील वर्षी लाॅकडाउनमुळे सहा ते सात महिने सलून दुकाने बंद होते. मिशन बिगिन अगेन' अंतर्गत सलून दुकाने उघडण्यास उशीरा परवानगी देण्यात आली.

सोशल डिस्टन्स, मास्क घालणे, सॅनिटायझर आदी करोना नियमाचे पालन सलून दुकानदार व्यवसाय करत आहेत. थोडेफार कुठे पूर्वपदावर आले असताना पुन्हा मिनी लाॅकडाऊन व आता लाॅकडाउन जारी झाला. त्यामुळे सलून दुकानदारांसमोर पुन्हा उपासमारीचे संकट उभे ठाकले आहेत. शहरात जवळपास पाच हजारांहून अधिल सलून दुकाने आहेत.

सलून दुकानदारांचा सर्वाधिक व्यवसाय रविवारी होतो. पण शनिवार व रविवार दोन दिवस दुकाने बंद ठेवण्याचे जिल्हा प्रशासनाचे आदेश होते. आता १५ दिवसाच्या लाॅकडाऊनमुळे तर सलून दुकाने बंद असून आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक दुकानदारांपुढे भाडे,कारागिरांचे वेतन कसे अदा करायचे हा प्रश्न उभा ठाकला आहे. सरकारने सलून दुकानदारांसाठी आर्थिक मदत घोषित करावी.

- अनिल परदेशी, सलून दुकानदार

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com