Video : मालेगावात टायगर-३ च्या प्रदर्शनावेळी सलमानच्या चाहत्यांनी चित्रपटगृहात फोडले फटाके
मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon
येथील मोहन चित्रपटगृहात (Theater) प्रदर्शित झालेल्या टायगर-३ (Tiger-3) या चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी अभिनेता सलमान खानचे (Actor Salman Khan) पडद्यावर आगमन होताच त्याच्या चाहत्यांनी गोंधळ घालत फटाक्यांची (Firecrackers) आतषबाजी करत चित्रपटगृह दणाणून सोडले. अकस्मात फटाक्यांचा दणदणाट सुरू झाल्याने प्रेक्षकांमध्ये भितीचे वातावरण पसरून एकच पळापळ झाली. यावेळी पोलिसांना (Police) पाचारण केल्यानंतर सालमानच्या चाहत्यांचा गोंधळ थांबला.
तब्बल अर्धा ते पाऊण तास सुरू असलेल्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे टायगर चित्रपटाचे प्रक्षेपण थांबवावे लागले. यावेळी चित्रपटगृहात रॉकेट, कारंजा, फुलझडींसह फटाक्यांच्या माळा देखील फोडण्यात आल्या. तर सुदैवाने चित्रपटगृहास आग (Fire) लागली नाही. सलमानप्रेमी चाहत्यांच्या (Fans) या धुडगुसमुळे प्रेक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून चित्रपटगृहात ज्वलनशील पदार्थ नेण्यास बंदी असतांना देखील हे चाहते फटाके आणतात कसे? असा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. तसेच चित्रपट गृहात फटाके फोडणार्यांवर पोलिसांतर्फे कठोर कारवाई केली जात नसल्यानेच शाहरूख व सलमानचे चाहते या अभिनेत्यांचा चित्रपट लागल्यावर धुडगुस घालत असल्याची संतप्त प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिली.
मालेगाव (Malegaon) येथील मोहन चित्रपटगृहात अभिनेता सलमान खानचा टायगर ०३ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित केला गेला. पहिल्या दिवशी पहिल्याच शो ला सलमानप्रेमी चाहत्यांनी मोठा केक कापून या चित्रपटाचे जल्लोषात स्वागत केले होते. रविवारी देखील चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल्ल होते. रात्री ०९ चा शो सुरू झाल्यावर पडद्यावर सलमान खानची एन्ट्री होताच चाहत्यांनी आरडाओरड करण्यास प्रारंभ केला.
यावेळी अतिउत्साही चाहत्यांनी स्वत:बरोबर आणलेले रॉकेट, कारंजे, फुलझड्या उडविण्यास प्रारंभ केल्याने संपूर्ण चित्रपटगृहात रॉकेट फिरत होते. तर काहींनी फटाक्यांच्या माळा काढून त्या फोडण्यास प्रारंभ केल्याने या आवाजाने चित्रपटगृह दणाणून गेले होते. हा प्रकार लक्षात येताच चित्रपटगृह व्यवस्थापनातर्फे शो बंद करण्यात येऊन पोलिसांना तातडीने पाचारण केले गेले. त्यानंतर पोलिसांची एन्ट्री होताच या चाहत्यांनी फटाके फोडण्याचे बंद केले. तर फटाके फोडल्याच्या संशयावरून दोघा-तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी कुसूंबारोडवरील कमलदिप चित्रपटगृहात शाहरूख खानचा जवान हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला असता रात्री ०९ च्या शोला शाहरूखच्या चाहत्यांनी फटाक्यांची प्रचंड आतषबाजी केल्याने चित्रपटाचे प्रदर्शन थांबवावे लागल्याची घटना घडली होती. फटाके फोडण्याच्या घटना शाहरूख व सलमान यांचे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर सातत्याने घडत असल्याने या अतिउत्साही चाहत्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी प्रेक्षकांसह चित्रपटगृह चालकांतर्फे केली जात आहे.