साल्हेर किल्ला जागतिक वारसा यादीत

युनेस्कोतर्फे तत्वत: मान्यता; विकासकामे मार्गी लावू : आ. बोरसे
साल्हेर किल्ला जागतिक वारसा यादीत

साल्हेर । वार्ताहर

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या बागलाण तालुक्यातील साल्हेर-मुल्हेर किल्याचा समावेश संयुक्त राष्ट्रसंघाच्या युनेस्कोने आंतरराष्ट्रीय वारसा स्थळ म्हणून तत्वत: मान्यता दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौदा किल्यांचा वारसा स्थळ म्हणून तत्वत: मान्यता मिळाली आहे. या किल्ल्यांमध्ये साल्हेर-मुल्हेर किल्याचा समावेश असल्याने बागलाण तालुक्याचा गौरव पुन्हा वाढला आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या शिक्षण, विज्ञान आणि सांस्कृतीक विभाग युनेस्कोने आंतरराष्ट्रीय वारसा स्थळ म्हणून महाराष्ट्रातील 14 किल्ल्यांना तत्वत: मान्यता दिली आहे. मराठा लष्करी वास्तू संरचना या प्रकारात राज्य पुरातत्व विभागाने भारतीय पुरातत्व विभागास 14 किल्ल्यांच्या श्रृंखलेचा प्रस्ताव पाठविलेला होता.

केंद्राच्या सांस्कृतीक मंत्रालयाच्या वतीने तो युनेस्कोला सादर करण्यात आला. त्यास नुकतीच मान्यता मिळाल्याचे कळविण्यात आले आहे. बागलाण तालुक्याच्या पश्चिमेला असलेला हा साल्हेर किल्ला सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील सर्वाधिक उंच किल्ला म्हणून ओळखला जातो. समुद्रसपाटीपासून 1567 मीटर उंचीवर हा किल्ला आाहे. इ.स. 1671-72 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी साल्हेरचा किल्ला जिंकला होता. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला हा साल्हेर किल्ला महाराष्ट्रातील शिवप्रेमींसाठी श्रध्देचा विषय राहिला आहे. या किल्ल्यावर भव्य शिवस्मारकाची निर्मिती करण्याचा निर्णय बागलाणचे आ. दिलीप बोरसे यांनी घेतला आहे.

साल्हेर किल्ल्यास ऐतिहासिक वारसा आहे. यास आंतरराष्ट्रीय वारसा स्थळ म्हणून देखील आता तत्वत: मान्यता मिळाली आहे. त्यामुळे या किल्ल्यावर देश-विदेशातील शिवप्रेमी पर्यटकांची, संशोधकांची गर्दी वाढून पर्यटनाची व्याप्ती वाढणार आहेत. या दृष्टीकोनातून पर्यटकांसाठी निवासस्थान, भोजनालय, दळणवळण आदी सुविधांसह वनतळे, कारंजे, तलावाची निर्मिती करण्यासाठी आपण निधी उपलब्ध करून ही कामे लवकरात लवकर मार्गी लावणार असल्याची माहिती आ. दिलीप बोरसे यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com