धक्कादायक : सॅनेटायझरच्या नावाने ऍसिडसदृश लिक्विडची विक्री

नागरिकांच्या आरोग्याशी खेळ
धक्कादायक : सॅनेटायझरच्या नावाने ऍसिडसदृश लिक्विडची विक्री

नाशिक | Nashik

करोनामुळे नागरिकांमध्ये असलेल्या भीतीचा गैरफायदा घेत काही महाभागांकडून बनावट सॅनेटायझरची सर्रास विक्री होत आहे.

जेलरोड परिसरातील एका मेडिकलमधून हँड सॅनिटायझरच्या नावाखाली अॅसिड सदृश्य लिक्विडची विक्री सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. असेच प्रकार शहरातील अनेक ठिकाणी सुरु आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

संसर्ग टाळण्यासाठी लोकांकडून स्वच्छता बाळगणे, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पालनासह सॅनिटायझरचा वापर केला जातो. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अधिक सावधगिरी बाळगण्यासाठी लोक थोड्या-थोड्या अंतरानं सॅनिटायझरचा उपयोग करून हात स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण प्रत्येक वेळेस आणि प्रत्येक ठिकाणी साबण-पाण्यानं हात स्वच्छ धुणे अशक्य आहे. यामुळे खबरदारी म्हणून हँड सॅनिटायझरचा वारंवार वापर होत आहे.

कोरोनाच्या दहशतीच्या आडून काही औषधविकर्त्यांनी बोगस हँड सॅनिटायझर विक्रीचा बाजार मांडला आहे. सॅनिटायझर निर्मितीच्या लोकल कंपनीच्या पाच लिटरच्या कॅनमधून ग्राहकांना मागणीनुसार सॅनिटायझर उपलब्ध करुन दिले जाते.

या सॅनिटायझरमध्ये अॅसिड सदृश्य लिक्विडचे प्रमाण जास्त असल्याने ग्राहकांना त्वचेचे आजार उदभवत आहे. हाताची जळजळ होण्यासह कातडी निघण्याचे प्रकार घडत आहेत. दरम्यान, बोगस सॅनिटायझरबाबत संबंधित औषध विक्रेत्याकडे तक्रार केली असता, त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.

सॅनिटायझरचा वापर करण्याचा सल्ला सरकारकडूनच देण्यात आला आहे. मात्र, बोगस सॅनिटायझरमुळे आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. याबाबत सरकारने कठोर कारवाई करण्याची गरज आहे.

- सोनू मल्होत्रा, ग्राहक

‘अन्न-औषध’ चे दुर्लक्ष

करोनासंबंधित मास्क, सॅनिटायझर व इतर औषधे यांचा काळाबाजार आणि बोगस विक्री सुरू आहे. बोगस उत्पादनामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. मात्र, या सर्व प्रकाराकडे अन्न-औषध प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे संबंधित विकर्त्यांना मोकळे रान मिळत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com