अवघ्या एक तासाभरात सर्व भाज्यांची विक्री

कृषी विभागातर्फे रानभाज्या महोत्सव
अवघ्या एक तासाभरात सर्व भाज्यांची विक्री

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने आदिवासी भागातील रानभाज्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी आयोजित केलेल्या रानभाज्या महोत्सवात अवघ्या एक तासातच सर्व भाज्यांची विक्री झाली.

रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त असलेल्या या भाज्यांचे महत्व दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांचा अशा उपक्रमांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे.नाशिक पंचायत समितीमध्ये रविवारी (दि.23) रानभाज्या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या हस्ते झाले.कृषी विभागातर्फे या महोत्सवाचे आयोजन केले होते.

पावसाळ्याच्या सुरुवातीला आढळून येत असलेल्या उच्च गुणधर्माने परिपूर्ण, अतिशय उपयुक्त रान भाज्यांमध्ये कंदभाज्या उदा.करांदे, कनगर, कडूकंद कोणचाई, आळू इत्यादी. तसेच हिरव्या भाज्या यात तांदूळजा, काठेमाठ, कुडा, टाकळा, कोराळा, कुरडू, घोळ, कवळा, लोथ इत्यादी.

फळभाज्यांमध्ये करटोली, वाघेडी, चिचोरडी, पायार, मोह, कपाळफोडी, काकड व फूल भाज्या उदा. कुडा, शेवळ, उळशी इत्यादी प्रकारच्या रानभाज्या ग्रामीण भागातून विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या.या महोत्सवात आलेल्या सर्व शेतकर्‍यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.रानभाज्या महोत्सवास ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

यावेळी नाशिक पंचायत समितीच्या सभापती कांडेकर, उपसभापती, कृषी विकास अधिकारे रमेश शिंदे, गट विकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी व पंचायत समिती अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


रानभाज्यांचे महत्त्व
आदिवासी भागातील शेतकर्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषीमंत्री दादा भुसे यांनी गेल्या 9 ऑगस्ट रोजी रानभाज्या महोत्सव आयोजित केला होता. त्याच धर्तिवर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने हा महोत्सव आयोजित केला आहे. यात कोणत्याही रासायनिक औषध फवारणीशिवाय आणि रासायनिक खतांचा वापर न करता भाजीपाला पिकवला जातो.

रासायनिक खतांचा वापर झालेला नसल्यामुळे या भाजीपाल्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. करोनाच्या काळात या भाज्या खाणार्‍या व्यक्तींना निश्चितपणे फायदा होतो. त्यामुळे या भाज्यांचे महत्व ओळखून नागरीकांनी भरपावसात अवघ्या तासाभरात या भाज्या खरेदी केल्या.

प्रत्येक रविवारी महोत्सवाचे आयोजन

कृषी विभागातर्फे आयोजित या रानभाज्या महोत्सवास नागरिकांचा उदंड प्रतिसाद पाहता प्रत्येक रविवारी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com