मालेगाव : बाधितांच्या उपचारासाठी ‘सहारा’ सज्ज
नाशिक

मालेगाव : बाधितांच्या उपचारासाठी ‘सहारा’ सज्ज

शाळा-महाविद्यालयातील करोना उपचार केंद्रांचे स्थलांतर

Abhay Puntambekar

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

शैक्षणिक सत्र सुरू करण्याचे दृष्टिकोनातून शाळा-महाविद्यालयात सुरू असलेले करोना उपचार केंद्र अन्यत्र हलवावे, अशी मागणी संस्था चालकांतर्फे करण्यात आली आहे. त्यामुळे शाळेतील उपचार केंद्र बंद करण्यात येऊन त्याचे स्थलांतर लवकरच मनपाने अधिग्रहीत केलेल्या सहारा रुग्णालयात केले जाणार आहे. बाधित तसेच संशयित रुग्णांवर उपचार केले जाणार असल्याने मनपा प्रशासनातर्फे ‘सहारा’ सर्वसुविधांनी सुसज्ज केले जात आहे.

शहरात करोनाच्या उद्रेकामुळे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने शहरातील मसगा महाविद्यालय, केबीएच विद्यालय, लोकमान्य हायस्कूल, ए. टी. टी. व जे.ए.टी. हायस्कुल, मालेगाव हायस्कूल आदी शाळा-विद्यालयांमध्ये करोना उपचार केंद्र तसेच क्वॉरंटाईन सेंटर मनपातर्फे सुरू करण्यात आले होते. मसगा महाविद्यालयात तर बाधित रुग्णांसाठी ऑक्सिजन व व्हेंटीलेटरची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली होती. प्रशस्त मैदानामुळे मोकळे वातावरण, इतर सुविधा तसेच डॉक्टर, सेवकांच्या उपलब्धतेमुळे मसगा केंद्र बाधित रुग्णांच्या पसंतीचे ठरले होते.

ऑगस्ट महिन्यापासून शैक्षणिक सत्र सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून शासनस्तरावर हालचाली सुरू आहेत. त्यामुळे शालेय सज्जता करण्याच्या दृष्टिकोनातून व इतर शैक्षणिक कामे सुरू करण्यासाठी शाळा-महाविद्यालय सुरू होणे गरजेचे आहे. मात्र या ठिकाणी करोना उपचार केंद्र असल्याने शिक्षकांबरोबर विद्यार्थी देखील शाळेत येण्यास धजावत नाही. त्यामुळे शैक्षणिक कामे जवळपास ठप्प झाली आहेत. शहरात करोना बाधितांची संख्या कमी झाली आहे व मनपाने अधिग्रहीत केलेल्या रूग्णालयांमध्ये उपचार होवू शकतात. त्यामुळे शाळा-विद्यालयातून करोना केंद्र हलवावे, अशी मागणी संस्था चालकांनी मनपा प्रशासनास पत्र देवून केली आहे.

या संदर्भात मनपा उपायुक्त नितीन कापडणीस यांच्याशी संवाद साधला असता येत्या तीन-चार दिवसात शाळा-महाविद्यालयातील करोना उपचार केंद्र बंद करण्यात येवून बाधीत रूग्णांवर सहारा हॉस्पिटलमध्ये उपचार केले जाणार आहे. याठिकाणी जवळपास २१० ते २३० खाटांसह इतर सज्जता करण्यात आली आहे. बाधीत तसेच संशयित रूग्णांवर या ठिकाणी तज्ञ डॉक्टरांतर्फे उपचार केले जातात. तसेच मन्सुरामध्ये देखील बाधीत रूग्णांवर आवश्यकता पडल्यास उपचार करण्याची सुविधा मनपा प्रशासनाने करून ठेवली असल्याचे कापडणीस यांनी सांगितले.

रुग्णांच्या सुविधांकडे लक्ष

शाळा-महाविद्यालयातील उपचार केंद्र बंद करण्यात येवून मनपाने अधिग्रहीत केलेल्या सहारा रुग्णालयात बाधित रूग्णांवर तसेच संशयितांवर उपचार केले जातील. व्हेंटिलेटर, ऑक्सिजनसह इतर सर्व सुविधा तसेच डॉक्टर, परिचारिका व स्वच्छता सेवक याठिकाणी नियुक्त करण्यात आले आहे. रुग्णांना उत्साह वाटावा या दृष्टिकोनातून लक्ष देण्यात आले आहे. तज्ञ डॉक्टरदेखील याठिकाणी उपस्थित राहतील. जवळपास २०० ते २३० बाधित रुग्णांवर सहारामध्ये उपचार होतील, अशी सज्जता करण्यात आली आहे. किरकोळ कामे येत्या एक-दोन दिवसांत पूर्ण होताच सहारा उपचारासाठी सज्ज होईल, अशी माहिती मनपा उपायुक्त नितीन कापडणीस यांनी दै.‘देशदूत’शी बोलताना दिली.

Deshdoot
www.deshdoot.com