एम.जी रोडवर वाहनेच वाहने; कारवाईचा जोर

दुचाकी निशाण्यावर
एम.जी रोडवर वाहनेच वाहने; कारवाईचा जोर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक शहराचा मागील काही वर्षांमध्ये झपाट्याने विकास झाला आहे. नाशिक मधील वातावरण पाहून जिल्ह्यातील इतर तालुक्यापासून राज्य बाहेरील लोक देखील नाशिकला पसंती देत आहेत. यामुळे नाशिकची लोकसंख्या देखील झपाट्याने वाढली आहे. तर दुसरीकडे वाहनांची संख्या देखील वाढली आहे,

मात्र त्या मानाने शहरात पार्किंगची ( Parking ) व्यवस्था प्रशासनाच्या वतीने करण्यात आली नसल्यामुळे सध्या शहरात अस्ताव्यस्त पार्किंगमुळे नागरिकांचे हाल होताना दिसत आहेत. विशेष करून शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या शालिमार, महात्मा गांधी रोड, मेन रोड आदी भागात मुख्य रस्त्यांवर वाहने पार्किंग करण्यात येत असल्यामुळे इतरांना त्रास सहन करावा लागतो तर नियमीत वाहतूक कोंडी देखील होत राहते.

मध्यंतरी पोलीस आयुक्तांनी शहरातील पार्किंग समस्या दूर करण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक घेतली होती.यामध्ये मनपा आयुक्त तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रतिनिधी यांना देखील आमंत्रित करण्यात आले होते.तसेच पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत झाली होती तर शहरातील पार्किंगची समस्या व त्यावर उपाय याबाबत समिती अभ्यास करणार होती. समितीने किती अभ्यास आतापर्यंत केला व त्याचा अहवाल काय आला तसेच पार्किंगची समस्या दूर करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने काही उपाय योजना करण्यात आल्या का? याबाबतचा खुलासा अद्याप करण्यात आलेला नाही. यामुळे शहरातील पार्किंगची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

नाशिक शहरातील मुख्य चौक समजल्या जाणार्‍या शालिमार चौकात चोहोबाजूंनी व्यवसायिक प्रतिष्ठान आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रातील एकमेव असे विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय देखील आहे. संदर्भ रुग्णालयात नाशिक जिल्हासह अहमदनगर, नंदुरबार, जळगाव तसेच धुळे आदी भागातील रुग्ण नियमित येत असतात. यामुळे या मुख्य चौकात दुकानांमध्ये खरेदीसाठी येणार्‍या नागरिकांपासून रुग्णालयात येणार्‍या उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांची वाहने या भागात लावण्यात येतात. लोकांना बाहेर गाड्या पार्किंग कराव्या लागतात.

तसेच दुकाने छोटी असल्यामुळे दुकानासमोर बाहेर गाडी लावण्याची जागा नसल्यामुळे रस्त्याच्याकडेला गाड्या लावण्यात येत आहेत. अशीच परिस्थिती परशुराम सायखेडकर नाट्यगृह समोरील रस्त्याची देखील झाली आहे. या ठिकाणी दुचाकीसह चार चाकी वाहने नियमित रस्त्याच्याकडेला लावण्यात येतात. काही लोक तर अनेक दिवस आपल्या गाड्या या ठिकाणी उभे ठेवतात.

महात्मा गांधी रोड ( M.G. Road, Nashik )परिसरात देखील परिस्थिती नवीन नाही. संपूर्ण परिसरात शेकडो ऑफिसेस आहेत, तसेच मोबाईलची दुकाने, चष्म्याची दुकाने, बँका, दवाखाने आदी व्यापारी प्रतिष्ठान आहेत. एवढा मोठ्या प्रमाणात शहरातील इतर भागातील गर्दी शालिमार, महात्मा गांधी रोड, मेन रोड परिसरात येते.

मात्र त्यांना वाहने पार्किंगसाठी जागाच उपलब्ध नसल्यामुळे गाड्या रस्त्यावरच उभ्या करण्याची वेळ येते. टोईंगवालेही फक्त दुचाकीवरच कारवाई करतात.तसे पाहिले तर चार चाकी वाहनेच रस्तयांवर उभी केली जातात.त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.त्याकडे मात्र पोलीसांचे दुर्लक्ष होते.अशा वेळेला प्रशासनाने त्वरित विशेष उपाययोजना करून या संपूर्ण भागात पार्किंगची समस्या दूर करावी अशी मागणी होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com