ग्रामीण रुग्णांना शहरातील रुग्णालयांमध्ये दाखल करावे

जि. प. अध्यक्ष क्षीरसागर यांची पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे मागणी
ग्रामीण रुग्णांना शहरातील रुग्णालयांमध्ये दाखल करावे

नाशिक । प्रतिनिधी Nashik

ग्रामीण भागातून अत्यवस्थ स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालय, नाशिक व वैद्यकीय महाविद्यालय, नाशिक येथे आणल्या जाणार्‍या रुग्णांना दाखल करून घेतले जात नसल्याच्या वाढत्या तक्रारी चिंताजनक आहेत. तालुकास्तरावरून जिल्हास्तरावर संदर्भित करण्यात आलेल्या रुग्णांना या रुग्णालयांमध्ये दाखल करून घेत सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली.

जिल्ह्यातील कोविड-१९ पॉझिटीव्ह निघालेल्या रुग्णांवर तालुका स्तरावरही चांगले उपचार केले जातात. पण काही रुग्णांच्या बाबतीत अत्यवस्थ स्थितीत त्यांना नाशिक येथे हलविण्यासाठी स्थानिक आरोग्य यंत्रणांकडून संदर्भित केले जाते. या अनुभवातून जाणार्‍या रुग्णांना मात्र प्रत्यक्षात नाशिक शहरामध्ये दाखल करून घेतले जात नाही. मानवतेच्या दृष्टिकोनातून ही बाब अत्यंत खेदजनक असून यामुळे ग्रामीण जनतेवर मोठा अन्याय होत आहे.

या परिस्थितीचा विचार करून अत्यवस्थ किंवा तालुकास्तरावरून संदर्भित केलेल्या करोना रुग्णांना खाटा व व्हेन्टीलेटर सुविधा पुरवण्यासाठी आरोग्य यंत्रणेला निर्देश देण्यात यावेत, असेही या पत्रात क्षीरसागर यांनी म्हटले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com