पीएफ खात्यामधून काढले ३० हजार कोटी!
नाशिक

पीएफ खात्यामधून काढले ३० हजार कोटी!

लॉकडाऊनचा ८० लाख कामगारांना फटका

Abhay Puntambekar

नवी दिल्ली । वृत्तसंस्था

करोना आणि लॉकडाउनच्या काळात ८० लाख भारतीयांनी भविष्य निर्वाह निधीतून थोडे थोडके नाही तर तब्बल ३० हजार कोटी रुपये काढले आहेत. एप्रिल ते जुलै या महिन्यांच्या कालावधीत इतका निधी काढण्यात आला आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ते जुलै महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यापर्यंत ८० लाख भारतीयांनी त्यांच्या पीएफ खात्यामधून ३० हजार कोटी रुपये काढले आहेत.

९ जून ते २९ जून या २० दिवसांच्या कालावधीमध्ये २० लाख कर्मचार्‍यांनी त्यांच्या पीएफ खात्यावरुन पैसे काढले आहेत. यावरुन सरकारने लॉकडाउनचे निर्बंध शिथिल केल्यानंतरही देशातील कामगार वर्गाला किती मोठा आर्थिक फटका बसला आहे याचा अंदाज बांधता येतो.

लॉकडाउनच्या काळात अनेकांना पगार कपातीचाही सामना करावा लागला. तसेच काहींना नोकर्‍याही गमवाव्या लागल्या. त्यामुळे गेल्या तीन ते चार महिन्यांच्या कालावधीत सुमारे ३० हजार कोटी हे पीएफ खात्यातून काढण्यावर लोकांनी भर दिला आहे, असेही इपीएफओने स्पष्ट केले आहे.

तंत्रज्ञानामुळे पीएफ खातेधारकांना तातडीने पैसे देणे सहज शक्य झाल्याचे रिटायर्डमेंट फंडचे मॅनेजर्स सांगतात. तंत्रज्ञानामुळे अधिक वेगवान पद्धतीने निधी खातेदारांना मिळाला. जून महिन्यामध्ये इपीएफओने दिलेल्या माहितीनुसार पगाराच्या आधारावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार एप्रिलपासून ज्या पीएफ खातेधारकांनी निधी काढला आहे, त्यांच्यापैकी बहुतांश हे १५ हजार किंवा त्याहून कमी मासिक पगार असणारे आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com