आरटीई प्रवेशाचे मेसेज मिळणार आज

आरटीई प्रवेशाचे मेसेज मिळणार आज

नाशिक । प्रतिनिधी

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील 25 टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने लॉटरी काढली आहे. गुरूवारपासून (दि. 15) विद्यार्थ्यांना प्रवेशाचे एसएमएस प्राप्त होणार आहेत. परिणामी आरटीई प्रवेशाची प्रतिक्षा संपणार आहे. मात्र, आरटीई प्रवेशाच्या उपलब्ध जागांच्या अनेक पटीने अर्ज आले आहेत. त्यामुळे पाल्याला प्रवेश मिळणार का? याबाबत पालकांचे लक्ष लागले आहे.

करोनामुळे अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्यामुळे आरटीई अंतर्गत प्रवेश मिळावा यासाठी अनेक पालक प्रयत्नशील आहेत. राज्यातील आरटीई प्रवेशाच्या 96 हजार 684 जागांसाठी 2 लाखांहून 22 हजार 29 विद्यार्थ्यांचे ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्राप्त झाले. नाशिकमध्ये आरटीई प्रवेशाच्या 4 हजार 544 जागांसाठी एकूण 13 हजार 330 अर्ज आले आहेत.

करोनाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाच्या काही प्रमुख अधिकार्‍यांच्या उपस्थितीत लॉटरी काढण्यात आली. त्यानंतर ऑनलाइन लॉटरीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांना प्रवेशाचे एसएमएस उद्या प्राप्त होतील. मात्र, पालकांनी केवळ ‘एसएमएस’वर अवलंबून न राहता आरटीई वेबपोर्टलवर प्रवेश अर्जाचा क्रमांक टाकून प्रवेशाची स्थिती जाणून घ्यावी, असे आवाहन शालेय शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.

आरटीई पोर्टलवर प्रवेशाची तारीख या ठिकाणी पालकांनी अर्ज क्रमांक टाकून अर्जाची स्थिती किंवा प्रवेशाचा दिनांक पहावा. प्रवेश घेण्याची तारीख पोर्टलवर दाखविली जाईल. त्या मुदतीतच पालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रे तपासून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी. ज्या विद्यार्थ्यांचे लॉटरीमध्ये सिलेक्शन झालेले आहे त्यांनी प्रवेशाकरिता एसएमएसद्वारे पुढील सूचना प्राप्त झाल्यानंतरच पडताळणी समितीकडे जावे.

प्रवेशासाठी कागदपत्रे

प्रवेशासाठी लागणारी मूळ कागद पत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रती, पोर्टलवरील हमी पत्र आणि अर्जाची स्थिती यावर click करून हमी पत्र आणि ऑलॉटमेंट लेटर ची प्रिंट काढून पडताळणी समितीकडे घेऊन जावे. जाताना पाल्याला बरोबर घेऊन जाऊ नये. मुदतीनंतर संबंधित पालकांचा प्रवेशाचा हक्क राहणार नाही.

पालकांनी अर्ज भरताना अर्जात निवासाचा जो पत्ता नोंद केला आहे त्याच पत्त्यावर Google location मध्ये red बलून दर्शविणे आवश्यक आहे location आणि घराचा नोंदविलेला पत्ता यामध्ये तफावत आढळल्यास प्रवेश रद्द केला जाईल. तसेच एकाच पालकांनी 2 अर्ज भरून ( duplicate अर्ज ) जर त्यांना लॉटरी लागली तरीही त्यांचा प्रवेश रद्द केला जाईल. प्रतिक्षा यादीतील पालकांनी बालकांच्या प्रवेशाकरिता पडताळणी समितीकडे सध्या जाऊ नये. त्यांच्या करिता पोर्टलवर स्वतंत्र सूचना दिल्या जातील.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com