राउंड द विकेट : व्हाईट बॉल चॅम्पियन इंग्लंड

राउंड द विकेट : व्हाईट बॉल चॅम्पियन इंग्लंड

डॉ. अरुण स्वादी

दैव देते आणि दैवच नेते...! पाकिस्तानला विश्वचषक स्पर्धेत पुढे चाल मिळाली ती बॅक डोअर एन्ट्री करून! साऊथ आफ्रिकेने खुज्या नेदरलँडकडून सपशेल शरणागती पत्करल्यामुळे! हे नशिबाचे दान त्यांच्या बाजूने पडले. त्यानंतर पाकिस्तान आपल्या कर्माने अंतिम फेरीत पोहोचले आणि आणि बाराव्या षटकाच्या सुरुवातीला 83 वर दोन अशा सुस्थितीत असताना त्यांच्या मधल्या फळीने पार नांगी टाकली..

ठीक आहे ,खेळपट्टी फलंदाजांच्या प्रेमात पडली नव्हती, पण रुसलेलीदेखील नव्हती. टार्गेट ठेवायचे दडपण पाकला पेलले नाही. 137 हा स्कोअर इंग्लंडच्या बलाढ्य बॅटिंगला काबूत राखण्यासाठी पुरेसा नव्हता, पण नेहमीप्रमाणे पाकिस्तानच्या गोलंदाजांनी कमाल केली. एका बाजूने धावा होत होत्या, पण विकेटही पडत होत्या. मात्र त्यांचे नशीब कसे बलवत्तर असते कोणास ठाऊक, केव्हाही कठीण समय येता स्टोक्स कामासी येता. एक बाजू बाजीप्रभू देशपांडेप्रमाणे लढवत, मैदानावर टिकून त्याने पाकिस्तानचे आक्रमण अक्षरशः अंगावर घेतले आणि योग्य वेळी प्रतिहल्ला करून सामना जिंकला. दैवाने दिलेली संधी पाकिस्तानच्या दैवानेच हिरावून घेतल्याचे विदारक दृश्य इथे पाहायला मिळाले. मॅच अटीतटीने लढली जात असताना शाहीन आफ्रिदीच्या पायात लचक भरली आणि त्याला आपले शेवटचे 11 चेंडू टाकता आले नाहीत हा पाकसाठी हार्टअटॅक होता. सामन्यातील उरलेली थोडीफार चुरस इथेच संपली आणि 1992 च्या पुनरावृत्तीचे स्वप्न इथेच भंगले.

पाकिस्तानच्या अपयशाचे एक प्रमुख कारण म्हणजे लेग स्पिनर आदिल रशीदने जेव्हा चेंडू हातभर फिरवला आणि दोन महत्त्वाच्या विकेट घेतल्या (ज्यात कर्णधार बाबर आझमची विकेट होती). पाकिस्तानचा शादाब खान मात्र खेळपट्टीकडून काहीही मदत घेऊ शकला नाही. गोलंदाजांनी सुरुवातीला विकेट घेतल्यानंतर शादाब आणि नवाजकडे पुढे खिंडार पाडायची मोठी जबाबदारी होती. पाकिस्तानची सामन्यावरील पकड तिथेच सुटली.

इंग्लिश संघ या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट होता यात शंकाच नाही. त्यांचे तेज आक्रमण अफलातून होते. वूड जायबंदी झाल्यानंतरही जॉर्डनने त्याची कमी भासू दिली नाही. फलंदाजांनी प्रत्येक वेळी चांगली धावसंख्या उभारली. 11 खेळाडूंमध्ये बेन स्टोक्स, लिव्हिंगस्टन, करन, वोक्स, मोईन असे अनेक अष्टपैलू खेळाडू असण्याचा मोठा फायदा त्यांना झाला. कर्णधार बटलर नेतृत्व मिळाल्यावर सुरुवातीला बावचळलेला वाटला, पण मुख्य स्पर्धा सुरू झाल्यावर त्याने परिस्थिती छान हाताळली. त्याचा शांत स्वभाव आश्वासक होता. ब्रावो...बटलर!

बाबर आझम आणि त्याच्या संघावर सडकून टीका करणार्‍या पाकिस्तानच्या माजी खेळाडूंचे आता काय मत आहे? त्याच्या संघाने अंतिम फेरी तर गाठलीच, पण झिम्बाब्वेच्या ‘दे धक्का’नंतर आपला खेळ उंचावत नेला. अगदी अंतिम सामन्यातही त्यांचा पराभव झाला असला तरी नाक कापले गेले नाही. उलट ते शेवटपर्यंत लढले. आमचा भारतीय संघ त्यांच्यासारखा लढला असता तर आम्हालाही अभिमान वाटला असता. पाकिस्तान क्रिकेटला त्यांच्या संघाचे व कर्तृत्वाचे कौतुक वाटले पाहिजे. त्यांच्याकडे अतिशय प्रतिभाशाली खेळाडू आहेत. उत्कृष्ट तेज गोलंदाज आहेत. अष्टपैलू खेळाडू आहेत. फलंदाजांचीच थोडी वानवा आहे. बाबर आणि रिझवानवर ते खूप अवलंबून राहतात हा मोठा प्रश्न आहे.

मात्र ते टी-20 मध्ये सेकंड बेस्ट आहेत हे निर्विवादपणे सिद्ध झाले आहे. इंग्लंडने मात्र 50 षटकांची आणि 20 षटकांची स्पर्धा जिंकून आपण व्हाईट बॉल क्रिकेटचे चॅम्पियन आहोत हे सप्रमाण सिद्ध केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com