राऊंड द विकेट : क्षेत्ररक्षकांनी गमावले...

राऊंड द विकेट :  क्षेत्ररक्षकांनी गमावले...

डॉ. अरुण स्वादी

फलंदाजांनी गमावले ते गोलंदाजांनी कमावले आणि गोलंदाजांनी कमावले ते क्षेत्ररक्षकांनी पार गमावले. एरव्ही हा सामना भारताने पाच-पंचवीस धावा खिशात ठेवून जिंकला असता, पण तसे होणे नव्हते. एखाद्या साथीच्या आजाराप्रमाणे एकमेकांचे पाहून आमची फिल्डिंग गचाळ होऊ लागली. भारताने मोजून एक-दोन-तीन रनआऊटच्या सोप्या संधी दवडल्या.

भरवशाच्या विराट कोहलीने एक डोंकीड्रॉप सोडला. हा झेल त्याने झोपेतसुद्धा पकडला असता, पण तसे होणे नव्हते. मारक्रम आणि मिलरने या संधीचा फायदा उठवला. प्रथम ते खेळपट्टीवर स्थिर झाले आणि मग ठरवून त्यांनी प्रथम हार्दिक पंड्या आणि नंतर रविचंद्रन अश्विन यांच्यावर हल्लाबोल केला. तरीही मॅच शेवटच्या षटकापर्यंत गेली. भारताकडे थोडेसे नशीब असते तर कोणी सांगावे हा सामना त्यांनी जिंकला असता.

मटणाच्या झणझणीत रश्श्याप्रमाणे तिखट असणार्‍या खेळपट्टीवर, हवेत असणारे भारतीय फलंदाजांचे पाय जमिनीवर आले हे एका अर्थी बरेच झाले. फायर विथ फायर ही स्ट्रॅटेजी प्रत्येक वेळी यशस्वी होतेच असे नाही. तेव्हा काही वेळा टी-ट्वेंटी क्रिकेटमध्येसुद्धा एखाद दोन षटके डोके खाली घालून शांतपणे खेळून काढावी लागतात. मारक्रम, मिलर तसे खेळले. भारतीय फलंदाजांनी राहुलचा अपवाद वगळता तेज खेळपट्टीवर उसळत्या मार्‍यावर प्रतिहल्ला चढवायचा प्रयत्न केला.

कर्णधार रोहित शर्मा, फॉर्मतला विराट कोहली, अगदी हार्दिक पंड्यादेखील एक्स्ट्रा बाऊन्समुळे फटके मारताना बाद झाले. दिनेश कार्तिक आणि अश्विन धावा वाढवण्याच्या नादात बाद झाले. ते क्षम्य होते. कारण तेव्हा वेळ तशीच होती. राहुल आपण फॉर्ममध्ये नाही हे प्रत्येक वेळेस सिद्ध करतो, पण आमच्या टीम मॅनेजमेंटचा त्याच्यावर फार भरंवसा आहे. एक तर तो चेंडूही भरपूर खातो. त्यात हे चेंडू पॉवर प्लेमधले असतात. त्यामुळे रोहित शर्मावर दुप्पट दडपण येते आणि त्यावर त्याची विकेट जाते. यावेळी तसेच झाले.

या सामन्यातही भारतीय फलंदाजीचा तारणहार सूर्यकुमार यादव होता. त्याने एका बाजूला पडझड होत असताना दुसर्‍या बाजूला आक्रमक खेळ केला. पर्थच्या तिखट विकेटवर त्याने केलेली ही फटकेबाजी कदाचित त्याच्या छोट्याशा करिअरमधील सर्वोत्कृष्ट डाव ठरेल. बाकीच्यांच्या बॅटला बॉल लागत नव्हता आणि सूर्याची बॅट आग तळपत होती. आजच्या घडीला तो भारताचा व्हाईट बॉल क्रिकेटमधला सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे याबद्दल यापुढे कोणीही संशय घेऊ नये. उलट त्याला लवकरात लवकर कसोटी क्रिकेटमध्ये संधी मिळायला पाहिजे, असे मला वाटते.

दक्षिण आफ्रिकेची तेज गोलंदाजी माझ्या मते या स्पर्धेतली सर्वोत्कृष्ट गोलंदाजी आहे. त्यांची फलंदाजी सस्पेक्ट आहे. एरवी हा विश्वचषक जिंकायची कुवत त्यांच्यामध्ये आहे. या सामन्यातही त्यांच्या चारही जलद गोलंदाजांनी 145 किलोमीटर वेगाने गोलंदाजी केली आणि भारताला पेचात पकडले. आता त्यांच्या संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश नक्की आहे. भारताला मात्र दोन्ही सामने किंवा किमान एक सामना आणि चांगला रनरेट ठेवायला लागेल. बांगलादेश आणि झिम्बाब्वे यांना कमी लेखायची चूक भारताने करू नये, पण पराभूत होऊनही भारतीय गोलंदाजांनी केलेली चांगली कामगिरी त्यांना दिलासा देईल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com