राउंड द विकेट : खुल जा सिम सिम...!

राउंड द विकेट : खुल जा सिम सिम...!

डॉ. अरुण स्वादी

पाकिस्तानचे क्रिकेट ( Cricket ) आणि राजकीय नेतृत्व याचा भरवसा कोणीच देऊ शकणार नाही. कोणत्याही क्षणी ते उसळू शकतात किंवा कोसळू शकतात. उपांत्य फेरीत त्यांच्याविरुद्ध खेळताना किवी कर्णधार केन विल्यमसन मनातल्या मनात म्हणत असेल, ‘आज पाकिस्तानचा दिवस नसू दे’! उपरवालेने उनका सुना तो ठीक है, नही तो न्यूझीलंड का वर्ल्ड कप जीतने का सपना फिर एक बार चूर-चूर हो जायेगा.

पाकिस्तान आणि किवी क्रिकेटमधला एक महत्त्वाचा फरक म्हणजे किविज टीम म्हणून खेळतात तर पाकिस्तान आपल्या एक दोन सुपर स्टार्सच्या बळावर लढाई जिंकतात. आज या घडीला अतिरथी म्हणावे असे न्यूझीलंडकडे कोणीही नाही. तरीही ते ‘ए ग्रुप’ टेबल टॉपर आहेत. त्यांच्या काही खेळाडूंची नावे गुगल करायला लागतात. फिन आलन हा त्यांचा नवा आक्रमक सलामीवीर! ऐकलेय कोणी त्याचे नाव? कोनवे त्यांचा अलीकडच्या काळातला सर्वात यशस्वी फलंदाज! किती माहिती आहे त्याच्या बद्दल? हे दोघे आणि वेन फिलिप्स कर्णधाराला साथ देतील.

उलट पाकिस्तानचे सलामीवीर त्यांचे शक्तिस्थान आहे. ते पुन्हा लवकर बाद झाले तर त्यांची फलंदाजी अडचणीत येऊ शकते. कारण मधल्या फळीला आत्ताच सूर गवसतो आहे. हॅरिसला तिसर्‍या क्रमांकावर खेळवायची चाल भलतीच यशस्वी ठरत आहे. दोन्ही संघांची गोलंदाजी मात्र परिपूर्ण आहे. शाहीन आफ्रिदीला गवसलेला स्विंग आणि टप्पा म्हणजे त्यांना सापडलेली सोन्याची खाण आहे. हे सोने त्यांना मालामाल करू शकते. पहिल्या दोन सामन्यांतील दाहक पराभवानंतर बाबरच्या संघाची भलतीच कुचेष्टा झाली. आता मात्र कुचेष्टेनंतर प्रतिष्ठा मिळते आहे, पण शाहीन एवढीच सॉलिड ट्रेंट बोल्ट नावाची सिलिकॉन चिप किविजकडे आहे. तो तेवढाच प्रभावी आहे. या दोन डावर्‍या गोलंदाजांमध्ये कोण बाजी मारतात यावर सामन्याचा निकाल अवलंबून आहे, असे मला वाटते.

सामन्यातील दोन्ही डावांतील या दोघांची चार षटके दिशा ठरवतील. न्यूझीलंडचे फिरकी गोलंदाज पाकिस्तानपेक्षा किंचित उजवे आहेत, पण तेज गोलंदाजांमध्ये डावे-उजवे करण्यासारखे फारसे काही नाही. तरीही हा सामना पाकिस्तान जिंकायची शक्यता 65% टक्के आहे. कारण पाकिस्तानचा संघ योग्य वेळी भरात येत आहे. त्यांच्या निम्म्या संघाला बाद फेरीत खेळायचा अनुभव आहे. न्यूझीलंडविरुद्धचे त्यांचे रेकॉर्ड चांगले आहे. महत्त्वाचे म्हणजे ते इथवर पोचतील, असे त्यांनाही वाटले नव्हते. निव्वळ दैवामुळे आणि 25 कोटी पाकिस्तानी क्रिकेट रसिकांच्या प्रार्थनेमुळे नेदरलँड्सने ‘खुल जा सिम सिम’ म्हणत दार उघडून दिले आहे. मग मेलेले मेंढरू आता सेमी फायनलच्या आगीला कशाला घाबरेल?

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com