राउंड द विकेट : उषःकाल होता होता...

राउंड द विकेट : उषःकाल होता होता...

डॉ. अरुण स्वादी

भारताच्या इंग्लंडविरुद्ध ( Ind Vs Eng )झालेल्या पराभवाचे पोस्टमॉर्टेम पुढचे काही दिवस चालू राहील. पराभवाची अनेक कारणे आणि काही सबबी पुढे केल्या जातील. मला मात्र वाटते, पहिल्या सत्रात आपण तितसे वाईट खेळलो नाही. उलट इंग्लंड फार चांगले खेळले. ते व्यवस्थित अभ्यास करून आले होते आणि त्यांनी अभ्यास केलेल्या पोर्शनवरच प्रश्नपत्रिका काढली गेली.

अडलेडच्या स्क्वेअर बाउंडरी लहान आहेत. म्हणून त्यांनी कटाक्षाने शॉर्ट पीच गोलंदाजीचा मोह टाळला. अगदी मोजून चार-पाच बॉल तसे टाकले. त्यामुळे स्क्वेअर कट किंवा पुल आमच्या फलंदाजांना फारसा मारताच आला नाही. फक्त शेवटच्या 4 ओवरमध्ये इंग्लंडची पिसे निघाली. हार्दिक पांड्या चौखूर उधळला नसता तर आपल्या जेमतेम 150 धावा झाल्या असत्या. आदिल रशिदला शिंगावर घेणे अवघड असते, पण त्या लिव्हिंगस्टनला आम्ही शेन वॉर्नसारखी इज्जत दिली, हे मात्र अनपेक्षित होते. कर्णधार बटलरने खेळलेला प्रत्येक जुगार योग्य ठरला.

पॉवर प्लेमध्ये पुन्हा एकदा आमच्या धावा झाल्या नाहीत. खेळपट्टीत थोडी जान होती हे खरे असले तरी आमचे हे दुखणे आता चांगलेच बळावले आहे. याला पर्याय काय? नव्या दमाचे ताजेतवाने सलामीवीर घेणे या घडीला योग्य ठरेल काय? याचा विचार निवड समितीला करायलाच लागेल.

पाठलाग करताना इंग्लंडच्या सलामीवीरांनी आपल्या शिडातली हवाच काढून टाकली. एव्हाना खेळपट्टी फ्लॅट झाली होती. बॉल बॅटवर मजेत येत होता. पहिल्या सत्रात तसे होत नव्हते, पण मला वाटते टॉस जिंकला असता तर मी फलंदाजीच घेतली असती, असे रोहित शर्मा म्हणाला होता. खेळपट्टीचा अंदाज बांधण्यात केवढी घोडचूक झाली होती. नाणेफेक हरल्याने हे गुलदस्त्यात राहणार!

आमच्या गोलंदाजांनी पार निराशा केली, असे आता म्हणायचे. खरे तर बटलर आणि हेल्सने लाजवाब प्रतिघात केला, असेच म्हणायला लागेल. इथेही त्यांनी भुवनेश्वरसाठी वेगळी स्ट्रॅटेजी आखली होती आणि त्याचा अवघड प्रश्न चुटकीसरशी सोडवला होता. नंतरचा पेपर एकदम सोपा झाला.

दोन देशांमधल्या स्पर्धा जिंकायच्या, लीग सामन्यांमध्ये चांगले खेळायचे, पण उपांत्य किंवा अंतिम सामना आला की नांगी टाकायची; ही आमची आता जुनी सवय झाली आहे. दुःख त्याचे जास्त आहे. आयपीएलमध्ये आमच्या खेळाडूंचा कस लागतो असे वारंवार सांगितले जाते, पण तिथे यशस्वी ठरलेले पृथ्वी शॉ, संजू सॅमसन, रवी बिष्णोई उमरान मलिकसारख्या खेळाडूंना अनुभव नाही म्हणून संघाबाहेर ठेवले जाते हे काही बरे नव्हे! शमी, अश्विन कार्तिक यांचे टी-20 क्रिकेट केव्हाच संपले आहे. रोहित, राहुल आणि भुवी यांची सद्दी संपल्यासारखी वाटते. एकूणच हा 10 विकेट आणि मोजून 4 षटकांचा मोठा पराभव जिव्हारी लागणारा आहे. त्याच्या पोस्ट मॉर्टेमनंतर कदाचित पुन्हा एकदा आपल्या क्रिकेटच्या नव्या मशाली पेटवायचा विचार करायला लागेल. उषःकाल होता होता, काळरात्र झाली, हेच खरे...!

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com