राउंड द विकेट : दिवस नेदरलँड्सचा

राउंड द विकेट : दिवस नेदरलँड्सचा

डॉ. अरुण स्वादी

दक्षिण आफ्रिकेचा ( South Africa ) संघ ‘चौकारों के बादशहा’ आहेत. आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांमध्ये, महत्त्वाच्या वेळी त्यांची अवस्था ‘अंगम गलितम’ अशी होते. कठीण समयी त्यांच्यावर कसले टेन्शन येत माहीत नाही, पण ते चोक व्हायच्या वेगवेगळ्या तर्‍हा शोधून काढतात. आत्महत्येचे नवे-नवे मार्ग शोधून काढण्याचे एखादे नवे पुस्तक ते लिहीत आहेत का? असे वाटायला लागते.

आता नेदरलँड संघ ( Netherland Team ) हा काही अधिकृत कसोटी संघ नाही. ते वर्षातले किती महिने क्रिकेट खेळतात याचे मला कुतूहल आहे. हॉकी आणि टेनिस हा त्यांचा राष्ट्रीय खेळ आणि क्रिकेट ते मनोरंजन म्हणून खेळतात. विश्वचषक खेळायला आले ते आले आणि दक्षिण आफ्रिकेच्या आशा-आकांक्षांना त्यांनी गळफास लावला. असे काही नाही की सामना खूप चुरशीचा झाला. दक्षिण आफ्रिकेला नशिबाने साथ दिली नाही.

उलट सामन्याच्या सुरुवातीपासून नेदरलँडचा संघ धडाकेबाज फलंदाजी करीत होता आणि एका वेळी तर पावणे दोनशे धावा तरी फलकावर लावतील असे वाटत होते, पण तसे झाले नाही. तसे हे 158 धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिकेसमोर ‘किस झाड की पत्ती’ होते, पण त्यांच्या फलंदाजांनी आंतरराष्ट्रीय दर्जा सोडा, साधा देशांतर्गत दर्जासुद्धा दाखवला नाही. बरे नेदरलँडचे गोलंदाज खूप तेज होते किंवा चेंडू खूप वळवत होते, अशा प्रकारचा कुठलाही भानामतीचा प्रयोग करत नव्हते, पण तरीही साऊथ आफ्रिकेची मधली फळी मंत्रिमंडळ कोसळतात, तशी कोसळली. त्याचा परिपाक हाच की उपांत्य फेरीत निश्चित प्रवेश असलेली बवूमाची टीम जोहान्सबर्गकडे उद्या प्रयाण करतील.

पाकिस्तानची टीम लाहोरला रवाना झाल्याचे बरेच मिमस् आपण आठवडाभर पाहत होतो, पण पाकिस्तानचे क्रिकेट म्हणजे रोलर कोस्टर राईड आहे. मात्र इतिहास हेच सांगतो की, सुरुवातीला पाकिस्तानला दणका मिळाला तर ते विश्वचषक जिंकू शकतात. शाहीन आफ्रिदीला स्विंग आणि टप्पा गवसला म्हणजे पाकला सोन्याची खाण गवसली आहे. लिहून ठेवा. बाबरचा हा संघही स्पर्धा जिंकू शकतो.भारतीय फलंदाजांनी सूर्यकुमार यादवच्या जीवावर चांगली धावसंख्या उभारली, पण रोहित व पांड्या अजून फॉर्मशी लपाछपी खेळत आहेत हे चांगले लक्षण नाही. गोलंदाज स्थिरावत आहेत तेवढे बरे आहे.

मात्र, भारत पाकिस्तानच्या विजयापेक्षा आजचा दिवस गाजवला तो नेदरलँड्सने. दक्षिण आफ्रिकेच्या अपयशी विश्वचषक लढायांमध्ये आणखी एक अपयशाचा लांच्छनास्पद अध्याय त्यांनी लिहिला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com