राउंड द विकेट : तळाच्या फलंदाजीची गोष्ट

राउंड द विकेट : तळाच्या फलंदाजीची गोष्ट

डॉ. अरुण स्वादी

प्रिय युझवेंद्र चाहल,

पत्र पाठवण्यास कारण की, तू भारतीय संघाचा सर्वश्रेष्ठ फिरकी गोलंदाज आहेस आणि व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये तुझे संघातील स्थान शंभर टक्के पक्के आहे. असे असूनही जवळपास सात वर्षे क्रिकेट खेळूनही अजून तू फलंदाज म्हणून चिमुटभरसुध्दा प्रगती दाखवली नाहीस याचे खूप आश्चर्य वाटतं. तुझे क्षेत्ररक्षणदेखील यथातथा होते, पण ते तू प्रयत्नपूर्वक सुधारलेस. म्हणजे तू जडेजा झाला नाहीस, पण बुमराहसारखा किमान दर्जा असलेला क्षेत्ररक्षक तरी झालास..परवा त्या कोवळ्या, मोजून 3 मटी 20फ सामने खेळलेल्या नसीम शहाने आपली बॅट फिरवून शेवटच्या षटकातील दोन्ही चेंडू थेट स्टेडियममध्ये भिरकावून दिले. आणि आपल्या संघाला अफगाणिस्तानविरुद्ध अशक्यप्राय विजय मिळवून दिला.

जे नसीम करू शकला ते तुला जमले पाहिजे असे नाही, पण एखादा चेंडू मिड विकेटकडे जोरात मारायलासुद्धा तुला कधी जमले नाही. ताकत नाही, असे तू म्हणू शकत नाहीस. अँड्रु सायमंडस तुला मस्तीत दोन्ही हातांनी उचलून फाइव स्टार हॉटेलच्या बाल्कनीतून खाली फेकायला निघाला होता तेंव्हा तु बारक्या तरी होतास. आता तसेही नाही. शिवाय सध्याच्या बॅट अशा असतात की मिसहिटदेखील सीमापार होतात. असे असताना तू फलंदाजीत असा ढ कसा राहिलास?

आमचं एक ठीक आहे रे! आम्हाला दहा ते सहा ऑफिसमध्ये मान मोडून काम करायला लागतं.फायली क्लिअर करायला लागतात. वर बोलणी खायला लागतात. तुला काय रे काम असतं? बायको दळण आणायला पाठवते? किराणा आणायला दुकानात जातोस? सारखं-सारखं ट्विट करत राहायचं या पलीकडे करतोस तरी काय? भारताचा स्टार खेळाडू तू! मटी 20फमधला सर्वात महत्त्वाचा गोलंदाज तू. वनडेतही स्पिनर म्हणून तुझी जागा संघात पक्की असते आणि तरीही फलंदाजीत आजही तू लिंबू-टिंबू राहिलास? पाकिस्तानच्या नसीमनेच नव्हे तर त्या दहानीनेदेखील पहिल्या सामन्यात मोजून 16 धावा काढल्या. त्याही एक उत्तुंग छक्का आणि चौका मारत. लंकेच्या तळाच्या फलंदाजांनी भारताविरुद्ध सामना जिंकून दिलाच ना? आजकाल मटी 20फतही अकराव्या फलंदाजाला सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरावं लागतं.

हे माहीत असूनही तू काहीच मनावर घेत नाहीस? सरळ बॅटने अर्धा-अर्धा तास किल्ला लढवणे सोपं नाही याची मला कल्पना आहे, पण स्लोग करून चेंडू मिड विकेट किंवा मिड ऑनवरून फेकायचा प्रयत्न करणे इतके अवघड आहे? अरे बाबा, मीसुद्धा तुझ्याएवढे क्रिकेट खेळलो असतो तर दोन-चार छक्के मारले असते, पण तुझ्या नावावर आणि आयपीएलमध्ये तू एकही सिक्सर मारली नाहीस.

आपल्या संघाची अवस्था बघ; तुझ्या आधी अर्शदीप येणार. त्याची बॅटिंग तुझ्यापेक्षा थोडी बरी एवढेच म्हणायचे. तो सरळ खेळतो, पण आडवे-तिडवे फटके मारत नाही. म्हणजे धावा करणे अवघड. त्याच्याही आधी येणार जसप्रीत बुमराह! त्याने थोडीफार फलंदाजी सुधारली आहे. षटकारही तो मारायला लागला आहे, पण त्याच्या फलंदाजीचा एकूणच बाज हा रामभरोसे वाटतो. शेवटच्या षटकात अकरा धावा हव्या असतील तर तो जिंकून देईल, असा विश्वास वाटतो? थोडक्यात आपले शेवटचे तीन फलंदाज धावा करण्यासाठी काहीही कामाचे नाहीत. त्यातच भुवनेश्वर कुमार असला तर शेपूट आणखी वाढणार.

पूर्वी बरी फलंदाजी करायचा. तो ऑल राऊंडर नव्हता, पण आठ नंबरला बरा वाटायचा. आता त्याला फलंदाज म्हणायचे जीवावर येते. त्यापेक्षा हेझलवूड बरा... तो मोहमद शामी किमान तलवार तरी फिरवायचा, पण आमच्या निवड समितीला तो मटी 20फ सामन्यासाठी योग्य वाटत नाही हा तर विनोद आहे, पण करणार काय, किंग इज ऑलवेज राईट! थोडक्यात, आम्ही सात फलंदाज घेऊन खेळतो आणि इतर संघ किमान नऊ फलंदाज घेऊन खेळतात. शिवाय त्यांचे शेवटचे फलंदाजही नशीब असेल तर धावा करू शकतात .

यामुळे होतंय काय, पांड्या, कार्तिक, पंत या पाचव्या सहाव्या-सातव्या क्रमांकाच्या फलंदाजांवर विलक्षण प्रेशर येतं.फदे दणादणफ नक्की केव्हा सुरू करायचं हे त्यांना कळतच नाही. कारण त्यांची विकेट पडली की पुढे रामनाम सत्य चालू होतं आणि त्यांनी फटकेबाजी लवकर सुरूवात केली नाही तर शेवटच्या काही षटकांमध्ये म्हणावा तसा रन रेट वाढत नाही. श्रभारताची खरी मजबुरी ही आहे, पण त्याला पर्याय काय? नुसती फलंदाजी वाढवण्यासाठी तुझ्या जागी अक्षर पटेलला घेणं नको वाटतं. कारण तू विकेट घेणारा गोलंदाज आहेस, पण ऑस्ट्रेलियात तू अयशस्वी ठरू लागलास तर अक्षर किंवा अश्विनला घेतले जाऊ शकते.एकदा जागा गेली की, पुन्हा मिळवणे आता सोपे नाही.

शिवाय रवी बिष्णोई डोक्यावर बसलाच आहे. तेंव्हा युझी, मनावर घे आणि बॅटिंगचा सराव कर. अशक्य काहीच नसतं. मागे म्हणे तू नेट्समध्ये तुझ्याच राजस्थान रॉयलच्या जोस बटलरला छक्का मारला होतास. त्याचा व्हिडिओ पण वायरल झाला होता. बाबा रे, असं काही वर्ल्ड कपमध्ये केलंस तर ठीक. एरवी ट्विटरवर फुल टाईम ट्विट करत बसायला लागेल.

कळावे, लोभ असावा.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com