नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या वतीने दर महिन्याच्या दुसर्या आणि चौथ्या रविवारी भरविल्या जाणार्या ऑरगॅनिक बाजाराला नाशिककरांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.

या ऑरगॅनिक बाजाराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना घेता यावा, यासाठी गंगापूररोड वरील शंकराचार्य न्याससंकुल पार्किंगमध्ये भरणार्या बाजाराबरोबरच कॅनडा कॉर्नर येथील बीएसएनएलच्या आवारातदेखील या रविवारपासून (दि. 31) प्रत्येक महिन्याच्या पहिल्या, तिसर्या आणि पाचव्या रविवारी सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत बाजार आयोजित करण्यात येणार आहे.

नाशिककरांना स्वच्छ, ताजा आणि उच्च दर्जाची फळे, भाजीपाला योग्यआणि माफक दरात उपलब्ध करून देण्यासाठी रोटरी क्लबने थेट शेतकर्यांशी संपर्क साधून भाजीपाला, फळे आणि धान्य ग्राहकांना उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला. विशेष म्हणजे या उपक्रमाला तमाम नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बहुसंख्य ग्राहकांनी हा बाजार कॅनडा कॉर्नर येथे भरवण्याची मागणी केली होती.

या पार्श्वभूमीवर रोटरी संस्थेने रविवार (दि. 31) पासून बीएसएनएलच्या आवारात हा बाजार भरविण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान शंकराचार्य न्यास संकुल येथेही नियमित बाजार भरणार असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा मुग्धा लेले यांनी सांगितले.

दरम्यान नागरिकांच्या आग्रहास्तव रोटरी ऑरगॅनिक बाजाराचा शहराच्या विविध मध्यवर्ती भागांत विस्तार करण्याचा संस्थेचा मानस असल्याचे सचिव प्रफुल बरडीया आणि विजय दिनानी यांनी सांगितले.

या ऑरगॅनिक बाजारचा लाभ जास्तीत जास्त नाशिककरांनी घ्यावा असे आवाहन रोटरी क्लबच्या अध्यक्षा मुग्धा लेले, कम्युनिटी सर्व्हिस संचालक हेमराज राजपूत, जनसंपर्क संचालक संतोष साबळे, रोटरी बाजार समन्वयक रफिक व्होरा, तुषार उगले आदींनी केले आहे.