
नाशिक । प्रतिनिधी Nashik
मनपाकडून ( NMC ) बँडीकूट रोबोटच्या मदतीने गटारींच्या चेंबरची स्वच्छता (Cleaning of chambers)करण्याचे प्रात्यक्षिक नुकतेच जुने नाशिक ( Old Nashik ) भागातील आझादनगर परिसरात करण्यात झाले. या रोबोटच्या वापराने ड्रेनेज आणि चेंबरच्या तळात असलेला मळ, कचरा, माती, दगड आदी घाण हायड्रोलिक पद्धतीने बाहेर काढता येणार आहे. यासाठी सफाई सेवकांना चेंबरमध्ये उतरुन स्वच्छता करण्याची गरज पडणार नाही. स्वच्छता करताना श्वास गुदमरणे तसेच जीवाला धोक्यात घालण्यासारखे प्रकार या पद्धतीमुळे टळणार आहेत.
कमी वेळेत अधिक काम आणि कमी मनुष्यबळाच्या मदतीने या प्रकारची कामे पूर्ण करून घेण्यासाठी मनपाकडून अत्याधुनिक तंत्र प्रणालीचा वापर करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत शहरातील सर्वच ड्रेनेज लाईन भूमिगत केल्या जात आहेत. वारंवार रस्ते खोदून ड्रेनेज लाईन स्वच्छ करण्याची आता आवश्यकता भासणार नाही.
खोल चेंबरमध्ये गॅस व मळजल असल्याने कामगारांकडून काम करणे धोकेदायक असते. रोबोटच्या सहाय्याने काम केल्यास जीवितहानी टाळता येईल व काम सुरळीत करता येईल. म्हणूनच मनपा बँडीकूट रोबोटचा वापर करण्याचा विचार करीत आहे.
यावेळी कार्यकारी अभियंता गणेश मैद, आर. एम. शिंदे, उपअभियंता पालवे, एजाज काजी, गुंजाळ, रवि पाटील, विभागीय अभियंता जगताप, पवार, कोकणे आदी उपस्थित होते.
लवकरच रोबोट खरेदी
रोबोटच्या हायड्रोलिक प्रणालीद्वारे विनासेवक ड्रेनेज लाईन आणि चेंबरची स्वच्छता केली जाणार आहे. त्यासाठी लवकरच रोबोट खरेदी केली जाणार आहे. तत्पूर्वी रोबोट कशा पद्धतीने काम करेल? त्याची कार्यक्षमता कशी असेल? त्यातून कशा पद्धतीने कामे साध्य होऊ शकतील? याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी मनपा अधिकारी, सेवक तसेच रोबोट कंपनीच्या अधिकार्यांनी रोबोटच्या मदतीने प्रत्यक्ष कामे करून घेण्याचे प्रात्यक्षिक केले. यावेळी ड्रेनेज आणि चेंबरची स्वच्छता करण्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले.