
वावी | वार्ताहर | Vavi
सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी गावात आज दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी साडेसात तोळे सोन्याचे दागिने व सुमारे पाच हजार रुपयांची रोख रक्कम लांबवली...
कहांडळवाडी गावात मीराबाई रावसाहेब वाघ या आपल्या भगवान व शंकर या दोन मुलांसोबत राहतात. त्यांची दोन्ही मुले भारतीय सैन्यदलात कार्यरत आहेत. त्यातील भगवान हा पंजाबमध्ये तर शंकर दिल्लीला आहे. दोन्ही सुना व नातवंडांसोबत राहणाऱ्या मिराबाई घर बंद करून नेहमीप्रमाणे शेतात गेल्या होत्या.
त्यांची एक सून शहा येथील जाधव पब्लिक स्कूलमध्ये नोकरीला असून ती शाळेत होती. मुलगा भगवान हा गेल्या आठवड्यात सुट्टी घेऊन गावी आला असून पत्नी अश्विनी तिच्यासोबत बाहेरगावी गेला होता.
दुपारच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरी कुणी नसल्याचा गैरफायदा घेत बंद दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. भगवान व मीराबाई राहत असलेल्या खोलीत कपाट उघडून सून अश्विनी हिने पाकिटात ठेवलेले दागिने चोरट्यांनी लंपास केले.
तसेच मागच्या खोलीत असलेल्या मीराबाई यांच्या या बॅगमध्ये असलेले दागिने व रोख पाच हजार रुपये रक्कम देखील चोरट्यांनी लांबवली. या घटनेत एकूण साडेसात तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे श्रीमती वाघ यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, पोलीस पाटील रवींद्र खरात यांनी वावी पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक विजय सोनवणे, हवालदार दशरथ मोरे, नितीन जगताप यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. आता श्वानपथकाला पाचारण करण्यात आली आहे.
कहांडळवाडी गावात अज्ञात जोडप्याने प्रवेश करीत सदरचे कृत्य केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यात लाल कलरचा पंजाबी ड्रेस परिधान केलेली अनोळखी महिलेस शेजारच्या महिलांनी बघितल्याचे सांगितले.