<p>नाशिक :</p><p>सिडकोतील लेखानगर परिसरातील मोबाईल शॉपीचे दुकान फोडून लाखो रुपयांचा एेवज चोरून नेल्याची घटना घडली.</p>.<p>लेखानगर येथील प्रगती मार्केट हे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे. या कॉम्प्लेक्समध्ये प्रीतेश कोठारी यांच्या मालकीचे पार्थ शॉपी हे मोबाईल विक्रीचे दुकान आहे. काल रात्री नेहमीप्रमाणे ते दुकान बंद करून घरी गेले होते. दरम्यान, रात्री 2 ते 4 वाजेच्या सुमारास चारचाकी वाहनातून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी लेखानगर येथील पार्थ शॉपी या दुकानाला असलेले कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न अपयशी ठरल्याने त्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने शटर उचकटल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून निष्पन्न होत आहे. चोरट्यांनी दुकानात प्रवेश केल्यानंतर दुकानातील मोबाईल, मोबाईल अॅक्सेसरीज, वाय-फाय राऊटर, लॅपटॉप, डेस्कटॉप व डीव्हीआर यांसह इतर साहित्य असा एकूण सात ते आठ लाख रुपयांचा मुद्देमाल दुकान फोडून चोरून नेला. दुकानमालक प्रीतेश कोठारी यांना माहिती मिळताच त्यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्याला कळविले. त्यानंतर पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक नखाते, इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर,स पो नी राकेश भामरे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन दुकानाची पाहणी केली. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ही चोेरी चद्दर गँगने केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करुन काही धागेदोरे हाती लागता आहेत का? याची माहिती घेत आहेत.</p>