त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रस्त्यांची चाळण

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रस्त्यांची चाळण

नाशिक । मोहन कानकाटे Nashik

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (Trimbakeshwar Taluka ) ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था ( Roads Condition )अतिशय बिकट झाली आहे. तालुक्यातील गणपतबारी ते पिंपळद,( Gapati Bari To Pimpalad) गणेशगाव फाटा ते ब्राम्हणवाडे गाव, धूमोडी ते ब्राम्हणवाडे हे रस्ते खड्डेमय झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे..

या रस्त्यांवरून नागरिकांची सतत ये-जा सुरू असते. परंतु ऐन पावसाळ्याच्या तोंडावर या रस्त्याची अवस्था खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा, अशी झाली आहे. येथील नागरिकांनी वेळोवेळी प्रशासनाकडे रस्त्याचे काम करण्याची मागणी करून देखील कुठल्याही अधिकार्‍याने याकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे ऐन पावसाळयात या रस्त्यांवरून मार्गक्रमण करणार्‍या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

नागरिकांसह वाहन चालकांना देखील या रस्त्यांवरून जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. परिणामी वाहनांचा अंदाज न आल्याने किंवा रस्त्यातील खड्यांमुळे मोठया प्रमाणावर चारचाकीसह दुचाकी पंक्चर होतात. तसेच या रस्त्यांवरून वाहनचालकांची वाहन चालवताना त्रेधातिरपीट उडते. तर अनेक ठिकाणी रस्ता गायब होऊन फक्त खड्डेच दिसत असल्याने वाहनचालकांना खड्डे चुकविण्याऐवजी रस्ता शोधावा लागत आहे.

या रस्त्यांच्या कामांबाबत अधिक माहिती घेतली असता या सर्व रस्त्यांचे काम डीपीडीसीच्या अंतर्गत येत असल्याने या रस्त्यांच्या कामासाठी 50 टक्के निधी उपलब्ध झाला होता. परंतु वेळेवर टेंडर न केल्याने या रस्त्यांच्या कामासाठी उपलब्ध असलेला निधी परत गेला. त्यामुळे या रस्त्यांचे काम अपूर्ण असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान गणपतबारी ते पिंपळद या रस्त्याचे काम पाच वर्षांपूर्वी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले होते. आज या रस्त्यांची चाळण झाली असून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधींनी या रस्त्यांच्या दुरावस्थेकडे लक्ष द्यावे अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. तसेच दुरावस्था झालेल्या या रस्त्यांवर पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर स्थानिक ठेकेदाराने मुरूम टाकून खड्डे बुजवून तात्पुरत्या स्वरूपाची मलमपट्टी केली होती. मात्र आता पावसाळ्यात हा रस्ता अक्षरशः चिखलमय झाला असून सध्यस्थितीत रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाल्याने छोटे मोठे अपघात होण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com