निफाड। प्रतिनिधी Niphad

तीन तालुक्यांना जोडणार्या व हायब्रीड अॅन्युइटी मॉडेल या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने राज्यात मंजूर झालेल्या मोजक्याच रस्त्यांपैकी एक असलेला सुरत, वघई, वणी, पिंपळगाव, निफाड, शिवरे फाटा, नांदूरमध्यमेश्वर, मांजरगाव, सिन्नर, पांढुर्ली, घोटी या रस्त्याच्या कामाला नांदूरमध्यमेश्वर परिसरात वन्यजीव विभागाने खो घातला आहे. परिणामी 200 कोटींचा हा रस्ता सध्या शासनाच्या दोन विभागाच्या अंतर्गत वादातून रखडला आहे.

सुरत, वघई, वणी, पिंपळगाव बसवंत ते निफाड पर्यंतच्या या रस्त्याचे काम पूर्णत्वास येत असतांना निफाड ते सिन्नर दरम्यानच्या रस्त्याचे काम देखील प्रगतीपथावर असतांनाच वन्यजीव विभागाच्या अधिकार्यांनी रस्ता ठेकेदाराला हे काम त्वरित थांबविण्याची ताकीद देऊन कामावर असलेली मशिनरी जप्त करण्याची धमकी दिल्याने रस्ता कामाचा ठेका घेतलेल्या एबीबी इंफ्रास्ट्रक्चर च्या सेवकांनी तातडीने मशिनरी काढुन घेतली आहे.

हा रस्ता अनेक ठिकाणी खोदून ठेवल्यानंतर वन्यजीव विभागाने या रस्त्याचे काम बंद केल्याने रस्त्यावर पडलेली खडी, खोदलेला रस्ता यामुळे रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रस्ता मजबूतीसाठी एका बाजूने रस्ता खोदल्याने उर्वरित निम्म्या रस्त्यावरुनच वाहनांची ये-जा सुरू असल्याने वाहन चालवितांना वाहन चालकाला अडथळ्यांची शर्यंत पार करावी लागत असून अनेकवेळा वाहन चालकांमध्ये लहान-मोठ्या चकमकी झडत आहेत. या रस्त्यामुळे मांजरगावच्या महिलेचा बळी गेला तर खानगाव थडी येथील तरुणाचे चारचाकी वाहन पूर्ण नादुरुस्त झाले होते.

सध्या गोदाकाठ भागात ऊस तोडणीचा हंगाम ऐन बहरात आला असून थोड्याच दिवसात द्राक्षहंगाम सुरू होत आहे. त्यामुळे ऊस वाहतूक व शेतमाल वाहतूक करणार्या वाहन चालकांना नानाविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. म्हाळसाकोरेपासून ते दिंडोरी तास पर्यंतच्या या रस्त्याचे काम बंद पडल्याने रस्त्यावरुन उडणारी धुळ, उखडलेली खडी, खोदलेला रस्ता यामुळे या रस्त्यावरील प्रवास खडतर बनला आहे.

रस्त्याच्या दुरावस्थेमुळे समोरून येणार्या वाहनाला साईड देणे म्हणजे मोठे अग्निदिव्य ठरत असून त्यातून अनेकवेळा वादाचे प्रसंग उभे ठाकत आहेत. वन्यजीव विभागाने हा परिसर इको सेन्सेटिव्ह झोन आहे. रस्त्याच्या कामामुळे चालणार्या मशिनरीच्या आवाजाने पक्ष्यांच्या अधिवासावर विपरित परिणाम होतो. त्यामुळे रस्त्याच्या कामाला वन्यजीव विभागाने हरकत घेतलेली आहे. तर अस्तित्वात असलेल्या रस्त्यावरच नविन रस्ता बनविण्यात येत असल्याने वन्यजीव विभागाने हरकत घेण्याची काहीएक गरज नव्हती असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्हणणे आहे.

मात्र त्यासाठी रस्ता कामाच्या ठेकेदाराने वन्यजीव विभागाच्या परवानगीसाठी अर्ज केलेला आहे. मात्र त्यासाठी आठ ते नऊ महिन्यांचा कालावधी लागू शकतो. तोपर्यंत हे काम बंदच राहणार असल्याने 200 कोटींचा हा रस्ता दोन विभागामुळे रखडला असून त्याचा त्रास शेतकर्यांना सहन करावा लागत आहे.

वन्यजीव विभागाची हरकत चुकीची

वन्यजीव विभागाने घेतलेली हरकत चुकीची आहे. रस्त्याचे काम तातडीने सुरू करणे गरजेचे आहे. या भागातील रस्त्याचा विकास होत असतांना काही ठिकाणी वन्यजीव विभागाने हा रस्ता बंद करण्यास सांगितले आहे. त्यामुळे सध्या काम बंद आहे. परंतू अशाप्रकारे काम बंद करणे चुकीचे आहे. वन्यजीव विभागाच्या अधिकार्यांनी तातडीने रस्त्याचे काम सुरू करण्यास परवानगी द्यावी.

दिलीप बनकर, आमदार (निफाड)

तर शेतकरी जनआंदोलन उभारतील

नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात पक्षाचा अधिवास हा तीन महिनेच असतो. मात्र नागरिकांना दळण-वळणासाठी बाराही महिने रस्त्याची आवश्यकता असते. हा रस्ता दिंडोरी, निफाड, सिन्नर या तालुक्यातून जातो. तसेच तीनही तालुक्याचे आमदार सत्ताधारी गटाचे आहे. भविष्यात वन्यजीव विभागाने रामसर दर्जाच्या नावाखाली शेतकर्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर परिसरातील गावचे शेतकरी गप्प बसणार नाही. तसेच हा पूर्वीचा रस्ता असून त्याच रस्त्याचे काम सुरू असल्याने वनविभागाला हरकत घेण्याचे काहीच कारण नव्हते. वन्यजीव विभागाने या परिसरात बंधारे, पूल व इतर बांधकामे बंद केली आहे. हे सर्वस्वी चुकीचे आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम तत्काळ सुरू करावे अन्यथा शेतकर्यांसोबत मोठे जनआंदोलन उभारले जाईल.

गणपत हाडपे, नंदू सांगळे (शेतकरी)