मारहाण करणाऱ्या व्यापाऱ्याविरोधात संताप; शेतकऱ्यांचा 'रास्ता रोको'

मारहाण करणाऱ्या व्यापाऱ्याविरोधात संताप; शेतकऱ्यांचा 'रास्ता रोको'
देशदूत न्यूज अपडेट

येवला | प्रतिनिधी | Yeola

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलाव झाल्यानंतर आपल्या मालाचे पैसे घेण्यासाठी गेलेल्या अक्षय गुडघे या शेतकर्‍याला व्यापार्‍याने मारहाण केली. तसेच कांद्याची पावती फाडून, त्याला दमबाजी करण्यात आली. याच्या निषेधार्थ शेतकर्‍यांनी नगर-मनमाड महामार्गावर ट्रॅक्टर उभे करून सुमारे तासभर रास्ता रोको आंदोलन केले...

रास्ता रोकोमुळे नगर व मनमाडच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. बाजार समितीत विकलेले कांद्याचे पैसे रोख मिळावेत, अशी मागणी गुडघे यांनी व्यापार्‍याकडे केली असता व्यापार्‍याने रोख पैसे देण्यास टाळाटाळ केली. शिवाय पावती फाडून दमबाजी केल्याचा आरोप गुडघे यांनी केला आहे.

विशेष म्हणजे बाजार समितीच्या व्यापार्‍यांच्या खळ्यावर हा प्रकार घडल्यानंतर संबंधित व्यापार्‍यांच्या काही प्रतिनिधींनी बसस्थानकाजवळ ट्रॅक्टर आडवून पुन्हा गुडघे यांना मारहाण केली. यामुळे शिवसेनेचे तालुकाप्रमुख रतन बोरणारे, प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन यांच्यासह शेतकऱ्यांनी आंदोलन केले.

यामुळे सुमारे तासभर वाहतूक विस्कळीत झाली होती. अखेर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर बाजार समितीत या वादावर पडदा टाकण्यासाठी बैठक सुरू होती.

मुख्य प्रशासक वसंत पवार, व्यापारी संचालक नंदकुमार अट्टल व इतर व्यापारी, सचिव कैलास व्यापारी, महाजन, बोरणारे, रयत क्रांतीचे वाल्मिक सांगळे, गुडघे आदींसह लोकप्रतिनिधी व शेतकरी या बैठकीस उपस्थित होते.

बँकांकडून व्यापार्‍यांना कमी पैसे मिळाले. त्यामुळे रोखीने पैसे देण्यास अडचण आली. दुसऱ्या दिवशी पैसे देऊ, असे शेतकर्‍याला कर्मचार्‍यांनी सांगितले पण त्यातूनच दोन दोन शब्द होऊन वाद निर्माण झाला.

नंदकुमार अट्टल, व्यापारी संचालक, बाजार समिती.

अडचण असल्याने कांदे विक्रीला आणले. रोख पैसे मिळावेत यासाठी मी संबंधित व्यापार्‍याकडे मागणी करत होतो. त्याचाच राग येऊन माझ्या कांद्याची पावती व्यापाऱ्याने फाडून टाकली. तसेच रस्त्यावर अडवून माझी मारहाणदेखील केली. या संदर्भात व्यापार्‍यांवर कारवाई व्हावी.

अक्षय गुडघे, शेतकरी, ममदापूर.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com