स्थलांतरित पक्ष्यांना दिशा दर्शवण्यात नद्यांची भूमिका महत्वाची : प्रा. बोरा

‘नदी काठावरील पक्षी’ वारसा फेरीला नाशिककरांचा प्रतिसाद
स्थलांतरित पक्ष्यांना दिशा दर्शवण्यात नद्यांची भूमिका महत्वाची : प्रा. बोरा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

वेळ सकाळची...स्थळ संत गाडगे महाराज धर्मशाळा...वड, पिंपळाच्या वृक्षांवर किलबिलाट करणाऱ्या शेकडो मैना जणू नदी महोत्सवात (River Festival) सहभागी झालेल्या निसर्गप्रेमींचे स्वागत करताय की काय असे वाटत होते...

जिल्हाधिकारी कार्यालय, पुरातत्व विभाग आणि नाशिक इतिहास संशोधन मंडळ आयोजित नदी महोत्सवाच्या ‘नदी काठावरील पक्षी’ या उपक्रमाप्रसंगी हे चित्र बघावयास मिळत होते. नेचर क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष व पक्षीप्रेमी प्रा. आनंद बोरा (Anand Bora) यांनी विविध पक्ष्यांची माहिती दिली.

अध्यक्षस्थानी निसर्ग अभ्यासक डॉ. श्रीस क्षीरसागर होते. यावेळी बोलताना प्रा. बोरा म्हणाले की, नदी (River) आणि पक्षी (Bird) यांचे अलोट नाते असून नदीत झालेल्या जलप्रदूषणामुळे (Water Pollution) असंख्य पक्षी शहराबाहेर स्तलांतरित झाल्याचे सांगत स्मार्ट सिटीच्या नादात गंगेचे काँक्रेटीकरण झाले.

पक्षांना बसण्यास जागाच राहिली नसल्याने गाडगे महाराज धर्मशाळा परिसरात असलेली बगळे, रात बगळे आदींची मोठी वसाहत येथून निघून गेली. स्वच्छ पाणी असण्याचे संकेत देणारा खंड्या हा पक्षीदेखील नदी काठावरून मोठ्या संख्येने स्थलांतरित झाल्याचे अभ्यासात दिसून आले असून यामुळे नदीमधील पाण्यात जल प्रदूषण पसरत असल्याचे जणू तो संकेत देत आहे.

स्थलांतरित पक्ष्यांना नेव्हिगेट करण्यास ग्रह ताऱ्याबरोबर नद्यांची भूमिका मोठी असल्याचे देखील त्यांनी सांगितले.शहरात नदी काठी पक्षी बघण्यासाठी जाण्याची मोठी परंपरा होती. मात्र ती आता हळूहळू लुप्त होत आहे. नदीला सिमेंटचे काठ आल्याने तेथील परिसंस्था नष्ट झाल्या आहेत. पक्षी उष्ण रक्ताचे असतात. उष्माच्या काळात त्यांच्या शरीरात उष्णतेचे प्रमाण वाढलेले असते. उन्हाळ्यात त्यांना पाण्याची आवश्यकता असते. पोटामधील पाण्याचा अंश कमी झाला की त्यांना हृदयविकाराचा झटकादेखील येण्याची शक्यता असते. असे ते म्हणाले.

या उपक्रमाप्रसंगी प्रा. बोरा यांनी काढलेल्या छायाचित्रांचे प्रदेशन, रवींद्र वामनाचार्य यांच्या तिकीटांवरील पक्ष्यांचा संग्रह, सुदेश तांबट यांनी पक्ष्याच्या घरट्याचे संग्रह आणले होते. फेरीमध्ये खंड्या, धोबी, बगळे, मैना, घार, पान कावळे, वेडा राघू, पाकोळी, कोतवाल, तुतारी, आदींसह अनेक पक्ष्यांची ओळख करून देण्यात आली.

उपक्रमात वनपाल अशोक काळे, डॉ. जयंत फुलकर, जेष्ठ पक्षिमित्र चंद्रकांत दुसाने, उमेश नागरे, संस्थेचे अध्यक्ष योगेश कासार-पाटील, सर्पमित्र मनीष गोडबोले, मनोज वाघमारे, पवन माळवे, रुपाली जोशी, पुरुषोत्तम आव्हाड, आशिष बनकर, अपूर्व नेरकर, नितेश पिंगळे, संजय बिरार, प्रमिला पाटील, दत्तात्रय कोठावदे, भाऊसाहेब राजोळे, चेतन राजापूरकर, किशोर वडनेरे, मेहुल थोरात, किरण बेलेकर आदींसह नाशिककर मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी महेश शिरसाट आणि डॉ. अजय कापडणीस यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. आभार दत्तात्रेय कोठावदे यांनी मानले.

गोदाकाठची जैवविविधता वाचवा

गोदाकाठावर तसेच गोदापात्रात जैवविविधतेचा खजिना आहे. हा खजिना वाढविण्यासाठी गोदाकाठावर देशी झाडे लावायला हवीत. अशा झाडांमुळे पक्षांचा अधिवास येथे वाढेल व नदी काठचे सौंदर्यही यामुळे सुरक्षित होईल. नदीकाठच्या सध्याच्या स्थितीमुळे पक्षी व जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचा सूर वारसाफेरीत सहभागी नाशिककरांमध्ये उमटला. गोदाकाठची जैवविविधता वाचविण्याची गरज यावेळी व्यक्त झाली.

Related Stories

No stories found.