पावसाअभावी टोमॅटो पीक वाया जाण्याचा धोका

पावसाअभावी टोमॅटो पीक वाया जाण्याचा धोका

निफाड । प्रतिनिधी Niphad

खरीप हंगामात ( Kharif Season )नगदी पीक समजल्या जाणार्‍या टोमॅटोचे ( Tomato ) गेल्या काही वर्षांपासून तालुक्यात उत्पादन वाढू लागले आहे. हंगामात सुरुवातीला किंवा शेवटी हमखास बाजारभाव मिळत असल्याने तालुक्यातील शेतकरी टोमॅटो लागवडीला पसंती देत आहे. यावर्षीदेखील शेतकर्‍यांनी टोमॅटो रोपे आणून लागवड केली. मात्र आता पावसाने उघडीप ( Lack of Rain ) दिल्याने टोमॅटो पीक वाया जाण्याचा धोका वाढला आहे.

गेल्या काही वर्षांपासून तालुक्यातील शेतकरी टोमॅटो लागवडीला विशेष महत्त्व देऊ लागले आहेत. पावसाळ्यात पहिला पाऊस पडताच जमिनीची मशागत, त्यानंतर मल्चिंग कागद सरीवर अंथरून व रोपवाटिकेतून रोपे आणून टोमॅटो लागवड केली जात आहे. त्यासाठी टोकर, तार, सुतळी याबरोबरच खते, औषधे, पोषके यांचाही मोठ्या प्रमाणात वापर करावा लागतो.

मागील महिन्यात किंवा या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ज्या शेतकर्‍यांनी टोमॅटो लागवड केली अशा टोमॅटोच्या झाडांना आता फुलकळी येत आहे. मात्र ऐन बहार धरण्याची वेळ आणि पाऊस गायब होण्याची एकच वेळ झाल्याने पावसाअभावी टोमॅटोची झाडे सुकू लागली आहेत. साहजिक दोन दिवसात पाऊस झाला नाही तर शेतकर्‍यांच्या मेहनतीवर पाणी फिरणार आहे.

टोमॅटो लागवडीसाठी साधारण एकरी एक ते दीड लाख रुपये खर्च येतो. याव्यतिरिक्त मजुरी, पाणी देणे, जमीन मशागत हा खर्च हिशेबात धरला तर टोमॅटो पीक आता जुगार ठरू लागले आहे. टोमॅटो प्रतिक्रेटस्ला 150 ते 200 रुपये भाव मिळाला तर जमाखर्चाची मिळवणी होऊ शकते. मात्र यापेक्षा कमी भाव मिळाला तर खर्च आणि मजुरी देणे महाग होऊन बसते. सद्यस्थितीत तालुक्याच्या उत्तर भागात टोमॅटोची मोठ्या प्रमाणात लागवड झाली असून आता पाऊस बरसला तरच या झाडांना जीवदान मिळणार आहे. त्यामुळे आता पावसाने समाधानकारक हजेरी लावावी, अशी अपेक्षा तालुक्यातील बळीराजा करत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com