निफाड। प्रतिनिधी Niphad

तालुक्यात 60 ग्रामपंचायतींसाठी 1 लाख 78 हजार 235 मतदारांपैकी 71870 पुरुष तर 62552 महिला असे एकुण 1 लाख 34 हजार 422 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने 75.42 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. साहजिकच वाढता मतदानाचा टक्का आता नेमका कुणाला धक्का देणार याचीच चर्चा तालुक्यातील गावपातळीवर सुरू झाली आहे.

तालुक्यात ओझर, उगाव, नांदूरमध्यमेश्वर, करंजगाव, विंचूर, सोनगाव, खेरवाडी, खेडलेझुंगे, पिंपळगाव नजिक, टाकळी विंचूर, शिरवाडे वणी, रानवड, नैताळे, म्हाळसाकोरे, लासलगाव, कोठुरे, देवगाव, चाटोरी आदी प्रमुख ग्रामपंचायतीसह 60 ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.

तब्बल दहा महिने करोनामुळे लांबलेल्या या निवडणुका नवीन वर्षात सुरू झाल्याने ऐन थंडीतही या निवडणुकीने तालुक्यातील वातावरण चांगलेच तापले होते. शह-काटशहा बरोबरच नातेवाईक, भाऊबंदकी यातच या निवडणुका झाल्याने व कोणत्याही परिस्थितीत गावाची सत्ता घ्यायचीच या इराद्याने साम-दाम-दंड-भेद वापरत उमेदवार, नेते, कार्यकर्त्यांनी प्रचारात कुठलीही कसर ठेवली नव्हती.

या निवडणुकीत आर्थिक देवाण-घेवाणदेखील मोठ्या प्रमाणात झाली असून गावपातळीवरील दोन्ही पॅनलचे नेते, उमेदवार व त्यांचे समर्थकांनी विजयाचा दावा केल्याने गावपातळीवरील सर्वच उमेदवारांची धडकन वाढली आहे. त्यातच नातेसंबंधाची विण, पॅनलचे नेते अन् कार्यकर्त्यांचा वाढता राबता व मतदारांशी असलेला संपर्क यामुळे प्रत्येक प्रभागात अटीतटीची लढत दिसून आली.

एका-एका मतासाठी पाहिजे ती किंमत मोजण्याची तयारी केली गेल्याने मतांचा टक्का वाढला आहे व आता हाच मताचा वाढता टक्का कुणाला धक्का देणार अन् कुणाला विजयासमीप पोहचवणार याचीच चर्चा गावागावात सुरू झाली आहे.

तालुक्यात सर्वाधिक कमी 40.39 टक्के मतदान ओझरला झाले आहे. येथे 10 जागा बिनविरोध निवडल्या असल्या तरी 7 जागांसाठी 27482 मतदारांपैकी 11101 मतदारांनी मतदान केले. ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर होणार असल्याने अनेक मतदारांनी या निवडणुकीकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. तर उर्वरित 59 ग्रामपंचायतींमध्ये काट्याची लढत झाली.

मतदारांनी सर्वच उमेद्वारांना शब्द दिल्याने मत नेमके कुणाच्या पारड्यात पडले याचा फैसला मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत मात्र नेते, कार्यकर्ते अन् उमेद्वार झालेल्या मतदानात आपल्याला किती व कुणाचे मतदान पडले असावे याचा अंदाज लावत आकडेमोडीत दंग झाले आहेत.

दरम्यान सोमवार दि.18 रोजी या ग्रामपंचायतीसाठी मतमोजणी होणार असल्याने या मतमोजणीची तयारी महसूल विभागाने पूर्ण केली असून येथील पिंपळगाव रोडवर असणार्या ग.दा. मोरे महाविद्यालयात मतमोजणी करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.