करोना बाधितांची वाढती संख्या चिंताजनक : कृषीमंत्री दादा भुसे
नाशिक

करोना बाधितांची वाढती संख्या चिंताजनक : कृषीमंत्री दादा भुसे

मास्क न वापरणार्‍या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी

Abhay Puntambekar

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

शहरात गेल्या काही दिवसांपासून करोना विषाणूचे संक्रमण फैलावत असल्याने बाधित रुग्णांची वाढत असलेली संख्या चिंता निर्माण करणारी ठरली आहे. संक्रमण रोखण्यासाठी प्रशासन-जनतेस संयुक्तरीत्या प्रयत्न करावे लागतील. आरोग्य यंत्रणेच्या सूचनांचे पालन काटेकोरपणे जनतेने करावे, विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन कृषीमंत्री दादा भुसे यांनी सर्वपक्षीय बैठकीत बोलताना केले.

मनपा प्रशासनाने महात्मा फुले योजनेत समाविष्ट असलेल्या खासगी रुग्णालयांत बाधितांवर उपचार झाले पाहिजे या दृष्टिकोनातून लक्ष घालावे. तसेच उपचार केंद्रांमध्ये औषधे, शौचालये व इतर सुविधांच्या अभावाबाबत येत असलेल्या तक्रारींचे त्वरित निराकरण करावे, असे निर्देश भुसे यांनी दिले.

गत पाच-सहा दिवसांपासून शहरातील पश्चिम भागात करोनाचा उद्रेक वाढला आहे. परवा ९२ तर काल ८३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जनतेत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर काल शासकीय विश्रामगृहात कृषिमंत्री दादा भुसे यांनी मनपा अधिकार्‍यांसह सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांची बैठक घेत उपाययोजनांसंदर्भात चर्चा करत रुग्णालयांतील सुविधांचा आढावा घेतला.

मनपा आयुक्त दीपक कासार, उपायुक्त नितीन कापडणीस, रोहिदास दोरकुळकर, आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे, डॉ. हितेश महाले यांच्यासह कृउबा उपसभापती सुनील देवरे, भाजप गटनेते सुनील गायकवाड, नगरसेवक मदन गायकवाड, राष्ट्रवादी कँग्रेसचे नेते डॉ. जयंत पवार, दिनेश ठाकरे, संदीप पवार, किशोर इंगळे, भारत चव्हाण, केवळ हिरे, दिलीप अहिरे, प्रमोद शुक्ला, श्रीराम मिस्तरी, संजय दुसाने आदी सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.

मास्क न वापरणार्‍या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी. तसेच उपचार केंद्रांमध्ये औषधांसह शौचालय सुविधांचा अभाव तसेच रुग्ण दाखल करून घेण्यास होत असलेली टाळाटाळ याबाबत सर्वपक्षीय नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. उपचाराबाबत कुठलीही कमतरता राहणार नाही याची दक्षता मनपा प्रशासनाने घ्यावी. तसेच महात्मा फुले योजनेत समाविष्ट असलेल्या खासगी रुग्णालयांमध्ये बाधितांवर उपचार झाले पाहिजे या दृष्टिकोनातून त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश भुसे यांनी अधिकार्‍यांना दिले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com