येवला । Yeola (प्रतिनिधी)

आकाशात घिरट्या घालणारे रंगीबेरंगी पतंग, रंगलेली पतंग काटाकाटीची स्पर्धा, त्यात यावर्षी ग्रामपंचायत निवडणुकीची रंगत यामुळे पतंगवेडे शहर समजल्या जाणार्या येवल्यात मकरसंक्रांतीच्या दिवशी वातावरण जास्तच रंगण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

पैठणीच्या या शहराला पतंगोत्सवाचे वेध लागल्याचे चित्र गल्लोगल्ली दिसत असून विक्रेते व शौकिनांची लगबग सुरू आहे. ‘गो करोना’चे संदेश देणारे पतंग बाजारात विक्रीला आले आहेत; परंतु आसारीसाठी लागणार्या बांबूचे भाव वाढल्यामुळे यंदा पतंग व आसारीच्या दरात वाढ झाली आहे.

गुजरातमधील अहमदाबादनंतर देशात दुसरा क्रमांक तर महाराष्ट्रात पहिला क्रमांक अशी ओळख असलेल्या व भोगी, संक्रांत व कर असे तीनही दिवस उत्साहवर्धक गाण्यांच्या तालावर थिरकण्यासाठी ओसांडून वाहणारा जोश अन् जल्लोषात केवळ पतंगोत्सव व त्यातील पतंगांची धूम करण्यासाठी व आनंद लुटण्यासाठी येवला शहरातील बच्चे कंपनीसह तरुणाई करोनाला विसरून खरेदीला लागले आहेत.

या उत्सवाला येथेच तयार झालेला पतंग, आसारी व मांजा दोरा वापरला जातो. येथील पतंगवेडे आसारी, पतंग खरेदीपासून मांजा बनवण्याच्या कामाला लागले आहेत. सोडावॉटरच्या काचेच्या बाटल्यांचा अतिशय बारीक भुगा करून हा भुगा, चरस, रंग याद्वारे मांजा तयार केला जातो.

येथील बाजारपेठेत विक्रेत्यांच्या दुकानांत सर्वत्र पतंग, दोरा, मांजा, आसारी खरेदीसाठी तसेच घरगुती मांजा बनवण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. शहात आसारी व पतंगाची दुकाने थाटली गेली आहेत. डीजेची बुकिंग, मित्रांची जमावाजमव, पाहुण्यांना येथे येण्याचे निमंत्रणही दिले जात आहे.

आठपाती आसारी मांजासह 400 रु., साहपाती आसारी मांजासह 300 रु., साहपाती छोटी आसारी 50 ते 120 रु., आठपाती मोठी आसारी 160 ते 250 रु., पतंग शेकडा भाव तीनचा पतंग 300 रु., अर्धीचा- बिगर गोठवाला 500 रु., अर्धीचा गोठवाला 600 रु., पाऊणचा पतंग 10-12 रु. नग, सव्वाचा पतंग 25 ते 30 रु. नग.