रिंगरोडला मान्यतेसह निधी द्यावा

खासदार गोडसेंचे नगरविकासमंत्र्यांना साकडे
रिंगरोडला मान्यतेसह निधी द्यावा

दे. कॅम्प । वार्ताहर

नाशिक शहराचा औद्योगिक दृष्ट्या झपाट्याने होत असलेला विकास तसेच वाढणारी लोकसंख्या लक्षात घेऊन. भविष्यात उद्भवणारी वाहतूकीची भीषण कोंडी यासाठी आजच शहराला बाह्यवळण रस्ता (रिंगरोड) होणे गरजेचे आहे. यासाठी प्रस्तावित बाह्यवळण (रिंगरोड) 200 फुटी व शहरांतर्गत 100 फुटी रिंगरोड तयार करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

नाशिकच्या विस्तारिकरणाकडे शासनाने बारकाईने लक्ष असून रिगंरोड विषयी शासन सकारात्मक असल्याची ग्वाही यावेळी ना.शिंदे यानी दिली.

गेल्या दशकभरात नाशिक शहराचा वेगाने विकास होत आहे. देशभरात धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध असल्याने नाशिक मध्ये परराज्यातून येणार्‍या भाविकांची संख्या मोठी आहे. शहरात वाहनांची संख्या मोठी असून त्यात बाहेरील राज्यातील वाहनांमुळे वाहतुकीवर मोठा ताण पडत आहे. यामुळे नागरिकांची व भाविकांची मोठ्या प्रमाणावर कुचंबणा होत आहे. यातूनच सतत होणार्‍या अपघातांमुळे जाणारे बळी ही चिंतेची बाब बनली आहे, ही बाब लक्षात घेऊन खा. गोडसे यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

यावेळी झालेल्या चर्चेत नाशिक मधील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी विशेष उपाययोजनाचे नियोजन होणे गरजेचा असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. भीषण वाहतूक कोंडी थांबविण्यासाठी बाह्यरिंगरोड 200 तर शहररांतर्गत रिंगरोड 100 फुटी होणे अंत्यत गरजेचे असल्याचे खा. गोडसे यांनी स्पष्ट करीत रिंगरोडच्या प्रस्तावाला मान्यता देवून निधी उपलब्ध करुन देण्याचे साकडे घातले.

मंत्री शिंदे यांनी देखील खा. गोडसे यांची मागणी न्यायिक असून नाशिक शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी रिंगरोड अत्यावश्यक असल्याने याबाबत लवकरच निर्णय घेवून याकामी निधी उपलब्ध करुन देण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com