‘तंत्रनिकेतन’चा सुधारित निकाल जाहीर
नाशिक

‘तंत्रनिकेतन’चा सुधारित निकाल जाहीर

Abhay Puntambekar

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

सामनगाव येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांना अखेर न्याय मिळाला आहे. गेल्या २७ जुलैला चुकीच्या निकषांवर लावलेल्या निकालामध्ये अनेक विद्यार्थी नापास झाले होते. त्यांनी अभाविपकडे तक्रार केली होती. अभाविपच्या शिष्टमंडळाने प्राचार्यांची भेट घेत सुधारीत निकाल जाहीर करण्याबाबत निवेदन दिले.

न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेर ७ ऑगस्टला तंत्रनिकेतनचा सुधारीत निकाल जाहीर करण्यात आल्याची माहिती अभाविपचे जिल्हा संयोजक दुर्गेश केंगे यांनी दिली. प्राचार्य ज्ञानेश्वर नाठे यांनीही सुधारीत निकाल जाहीर झाल्याचे स्पष्ट केले आहे.

अनेक विद्यार्थ्यांना सुधारीत निकालामुळे न्याय मिळाला आहे. निकालातील त्रुटी दूर झाल्यामुळे न्याय मिळाल्याची पालक व विद्यार्थ्यांची भावना आहे. उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी परीक्षा रद्द करण्याची घोषणा केल्यामुळे विद्यार्थी आनंदात होते.

मात्र, निकाल लागताच विद्यार्थ्यांना धक्का बसला. डिप्लोमाचा सुधारित निकाल जाहीर झाला असला तरी विद्यापीठ निकालांमध्ये त्रुटी आहेत. त्या विद्यार्थ्यांना अभाविप न्याय मिळवून देईल, असे दुर्गेश केंगे यांनी सांगितले.

दरम्यान, मयूर सानप या विद्यार्थ्यांने सांगितले की, २७ जुलैला निकाल बघितल्यावर एकदम टेन्शन आले होते. आमचे रेग्युलरचे विषय बॅकलॉग ठेवण्यात आले होते. आम्हाला परीक्षा देऊ न देता अपयशी ठरविण्यात आले होते.

अभाविपने महाविद्यालयाकडे सुधारित निकाल जाहीर करण्याची मागणी केली. आता सुधारित निकाल जाहीर झाला आहे. वेदांत पाठकने सांगितले की, मागच्या सत्रात मी सर्व विषयांमध्ये उत्तीर्ण होतो. पण या निकालात माझे २ विषय बॅकलॉग ठेवण्यात आले होते. निकाल बघून धक्का बसला. अभाविपने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सुधारीत निकाल मिळाला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com